Bharat : भारतासाठी वापरण्यात येणारा इंडिया (INDIA) शब्द हटविण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याच्याही चर्चा आहेत. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. 2020 पासून या चर्चा सुरू झाल्या होत्या. विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) तयार केली आहे. या आघाडीला शह देण्याच्या उद्देशानेही सरकारने या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
डिसेंबर 2022 मध्ये गुजरातमधील आणंद येथील भाजप खासदार मितेश पटेल यांनी लोकसभेत इंडियाचे नाव बदलून ‘भारत’ (Bharat) किंवा ‘भारतवर्ष’ करण्याबाबत सप्टेंबर 1949 मध्ये घटना सभेने चर्चा केल्याप्रमाणे प्रश्न उपस्थित केला. पटेल यांनी असा दावा केला की ‘इंडिया’ हे ‘देश ज्या गुलामगिरीच्या अधीन होते’ त्याचे प्रतीक आहे, कारण त्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नाव दिले होते.
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या ‘अमृत काल’ दरम्यान देशातील जनतेला ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून’ आणि अशा मानसिकतेशी संबंधित कोणत्याही घटकांपासून मुक्त करण्यावर भर देत आहे. राज्यघटनेतून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्याची योजना या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी दावा केला आहे की, या प्रस्तावाची तयारी सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, 18-22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार ‘इंडिया’ शब्द हटवण्याच्या प्रस्तावाशी संबंधित विधेयक मांडू शकते.
सूत्रांवर विश्वास ठेवला तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मधील भारताच्या व्याख्येमध्ये वापरलेल्या ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्याचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे. उल्लेखनीय आहे की अमृत कालच्या पाच व्रतांवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, त्यापैकी एकामध्ये गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता समाविष्ट आहे.
18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार
संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून सरकारच्या कामकाजाचा विचार करता ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने 2 सप्टेंबर रोजी ही माहिती दिली होती. 17 व्या लोकसभेचे 13 वे अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून सरकारच्या कामकाजाचा विचार करता ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने सांगितले होते. त्याच वेळी, राज्यसभा सचिवालयाने आपल्या बुलेटिनमध्ये सदस्यांना सांगितले होते की राज्यसभेचे 261 वे अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 18, 19, 20, 21 आणि 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
हे सत्र साधारणपणे सकाळी 11 ते दुपारी 1 आणि त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 6 यावेळेत चालणार असल्याचे त्यात म्हटले आहे. सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास आणि अशासकीय कामकाज होणार नाही. मात्र, सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर केलेला नाही. संसदेच्या या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.