मुंबई – वनडेच्या कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे खुलासे केले होते आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) खोटा असल्याचे जवळपास सिद्ध केले होते. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड विराटला कारणे दाखवा नोटीस बजावू शकते, अशा बातम्या येत होत्या. आता सौरव गांगुलीने हे वृत्त फेटाळून लावले असून बोर्डाची अशी कोणतीही योजना नसल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कोहलीने पद सोडले नसते तर त्याची हकालपट्टी करण्यात आली असती, असे अनेक बातम्या समोर आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बोर्ड अध्यक्ष गांगुलीला तत्कालीन कसोटी कर्णधार कोहलीला कारणे दाखवा नोटीस बजावायची होती, असेही सांगण्यात आले. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर गांगुलीसह बोर्डाचे काही सदस्य विराटवर नाराज झाले होते. याबाबत गांगुलीने बोर्ड सदस्यांशी संवाद साधला होता. विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी तसे न करण्याचा निर्णय घेतला.
गांगुली काय म्हणाला?
सौरव गांगुलीने सांगितले की बीसीसीआयची अशी कोणतीही योजना नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड विराटला कोणतीही नोटीस पाठवत नाही. विराट कोहलीनेही कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले असून तो तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाज म्हणून खेळणार आहे. विराटने यापूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि आता त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले आहे.
नेमका विराट काय म्हणाला होता
दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि बोर्डाच्या इतर सदस्यांवर खोटे बोलल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला होता. टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याशी कोणीही बोलले नाही, असे विराटने म्हटले होते. याशिवाय त्याला वनडेत कर्णधारपदावरून हटवण्यापूर्वी दीड तास आधी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्याचवेळी सौरव गांगुली म्हणाला होता की, विराटशी बोलल्यानंतरच रोहितला वनडेचे कर्णधारपद देण्यात आले होते.