Cricket : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी मंगळवारी सांगितले, की बोर्डाचे असे कोणतेही धोरण नाही ज्यामुळे भारतीय खेळाडूंना परदेशी क्रिकेट (Cricket) लीगमध्ये भाग घेता येईल. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) द्वारे आयोजित T20 लीगच्या उद्घाटन हंगामात खेळणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर शुक्ला यांनी हे वक्तव्य केले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोर्ड आपल्या खेळाडूंना कोणत्याही परदेशी क्रिकेट लीगमध्ये भाग घेऊ देणार नाही. राजीव शुक्ला यांनी एएनआयला सांगितले की, “आम्ही आमचे खेळाडू परदेशातील इतर कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये उपलब्ध करून देत नाही. याबाबत आमचे सरळ धोरण आहे. आमची इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही एक मोठी लीग आहे आणि त्यामुळे आम्ही खेळाडूंना कोणत्याही प्रकारे कोणत्याही विदेशी लीगबरोबर करार करण्याची परवानगी देऊ शकत नाही.
दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि UAE क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी सुरू होणार्या त्यांच्या T20 लीगची घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल फ्रँचायझींनी या दोन लीगमध्ये संघ खरेदी केल्यामुळे भारतीय खेळाडूही या दोन लीगमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र खेळाडूंनी बोर्ड आणि आयपीएल प्रती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला वाटत आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडू कोणत्याही विदेशी क्रिकेट लीगमध्ये सहभागी होतील याची शक्यता कमीच आहे.