Baramati Lok Sabha : बारामतीत नणंद-भावजयमध्ये सामना; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी

Baramati Lok Sabha 2024 : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ बारामती. या मतदारसंघात आज शरद पवार गटाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी (Supriya Sule) जाहीर केली. यानंतर महायुतीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असतानाच महायुतीने उमेदवार निश्चित केला आहे. शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित करताच थोड्याच वेळात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी निश्चित केली. यानंतर आता बारामती मतदारसंघात नणंद-भावजय यांच्यात लढत निश्चित झाली आहे.

महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. वर्धा मतरारसंघातून अमर काळे, दिंडोरी मतदारसंघातून भास्कर भगरे, बारामती मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरुर मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Baramati Lok Sabha

शिरुर मतदारसंघात माजी खासदार आढळराव पाटील यांनाच तिकीट मिळेल असे मानले जात आहे. तर दुसरीकडे आज शरद पवार गटाने खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली. महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील आठवड्यात आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर आता त्यांना फक्त अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे. त्यानंतर या मतदारसंघात पुन्हा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली. यानंतर महायुतीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर बारामतीत आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात सामना होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Baramati Lok Sabha

नगरमध्ये विखे विरुद्ध लंके टफ फाईट 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत अखेर निश्चित झाली आहे. या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केली होती.  परंतु, महाविकास आघाडी मात्र तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. परंतु, येथे उमेदवार काही मिळत नव्हता. निलेश लंके यांचेही तळ्यात मळ्यात सुरू होते. अखेर त्यांनी काल सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता नगर दक्षिण मतदारसंघात लंके सुजय विखेंना टफ फाईट देतील अशी चिन्हे आहेत.

Leave a Comment