Baramati Constituency : बारामतीकरांनी दिली लेकीला पसंती! नणंद-भावजयीच्या अटीतटीच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय

Baramati Constituency : बारामती लोकसभेचा निकाल हाती आला आहे. या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष होता. पण या अटीतटीच्या लढतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंचा विजय झाला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.

या लोकसभा निवडणुकीत बारामतीत अनेक राजकीय दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील बारामती लोकसभा जागा व्हीआयपी जागांमध्ये गणली जाते. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे येथून खासदार आहेत. पण शरद पवारांना पहिल्यांदाच बारामतीत त्यांच्याच कुटुंबाचे आव्हान उभे ठाकले असून यावेळी त्यांना बालेकिल्ला वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

विशेष म्हणजे बारामती मतदारसंघ हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी 1984 मध्ये पहिल्यांदा ही जागा जिंकली होती. तेव्हापासून बारामतीची सत्ता पवार कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. पण पवार घराण्यातील वादामुळे ही जागा काका-पुतण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनली होती.

दरम्यान, सुप्रिया सुळे या 2009 पासून सातत्याने लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत आणि येथून तीनदा विजयी झाल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार कांचन राहुल कूल यांचा पराभव केला होता. तर बारामती लोकसभा जागेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान झाले. येथे एकूण 2114663 मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार 1112357 तर महिला मतदार 1002273 आहेत.

Leave a Comment