मुंबई- इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या (IPL) सीजनसाठी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव (Mega auction) होणार आहे. यासाठीची नोंदणी 20 जानेवारीला पूर्ण झाली असून आतापर्यंत 19 देशांतील 1 हजार 214 खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. यामध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, ही मेगा लिलावाची अंतिम यादी नाही. सध्या खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि केवळ निवडलेल्या खेळाडूंचा अंतिम यादीत समावेश केला जाईल. यावेळी मेगा ऑक्शनमध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ या हंगामात आयपीएलमध्ये सामील होणार आहेत.
मेगा लिलावाच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या 1 हजार 214 खेळाडूंपैकी 270 खेळाडू असे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे. तर 903 खेळाडू असे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी एकही सामना खेळलेला नाही. यामध्ये 41 खेळाडू अशा देशांतील आहेत ज्यांच्या संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही. हे संघ फक्त T20 किंवा ODI सामने खेळतात.
आयपीएलचा एक संघ जास्तीत जास्त 25 आणि किमान 18 खेळाडू आपल्या संघात घेऊ शकतो. या अर्थाने, सर्व 10 संघ मिळून जास्तीत जास्त 250 खेळाडू खरेदी करू शकतात. यातील 33 खेळाडूंना यापूर्वीच कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजेच मेगा ऑक्शनमध्ये जास्तीत जास्त 217 खेळाडू खरेदी करता येतील. यामध्ये परदेशी खेळाडूंची सर्वाधिक संख्या 70 आहे.
मेगा लिलावात कोणत्या खेळाडूंवर बोली लावली जाणार
270 खेळाडू ज्यांनी आपल्या देशासाठी किमान एक सामना खेळला आहे. यामध्ये 61 भारतीय आणि 209 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
41 खेळाडू ज्यांच्या राष्ट्रीय संघाला अजूनही कसोटी संघाचा दर्जा नाही. (उदा. नामिबिया, कॅनडा इ.)
149 खेळाडू, ज्यांनी यापूर्वी आयपीएल खेळले आहे परंतु ते आपल्या देशासाठी खेळलेले नाहीत. यामध्ये 143 भारतीय आणि सहा विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
692 भारतीय खेळाडू ज्यांनी टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही.
62 परदेशी खेळाडू ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही