नवी दिल्ली : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ऑगस्ट महिना निश्चित चांगला राहिला आहे. कारण या महिन्यात देशात जवळपास सर्वच प्रकारांतील वाहनांची जबरदस्त विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, वाहनांच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशननुसार, वाहनांच्या एकूण विक्रीत 14.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 6.66 टक्के वाढ झाली आहे. तीनचाकी वाहने 79.70 टक्के, प्रवासी वाहने 38.71 टक्के आणि कमर्शियल वाहनांच्या विक्रीत 97.94 टक्के वाढ झाली आहे. ट्रॅक्टरच्या विक्रीत सुद्धा 5.50 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
प्रवासी वाहनांच्या विक्रीत मारुती सुझुकी कंपनी आघाडीवर राहिली. कंपनीने 1 लाख 8 हजार 944 वाहनांची विक्री केली. त्यानंतर ह्युंदाई 43 हजार 988, टाटा मोटर्स 25 हजार 577, महिंद्रा 16 हजार 457 आणि kia motors ने 13 हजार 900 वाहनांची विक्री केली.
दुचाकी वाहनांच्या विक्रीत Hero Motocorp कंपनीने पहिला क्रमांक मिळवला आहे. कंपनीने एकूण 3 लाख 13 हजार 74 वाहनांची विक्री केली. त्यानंतर होंडा मोटारसायकलने 2 लाख 48 हजार 108, बजाज 1 लाख 23 हजार 697 आणि सुझुकी कंपनीने 44 हजार 969 दुचाकी वाहनांची विक्री केली.
कमर्शियल वाहन प्रकारात टाटा मोटर्स कंपनी आघाडीवर राहिली. या काळात कंपनीच्या 20 हजार 805 ट्रक आणि बसची विक्री झाली. त्यानंतर महिंद्रा कंपनीने 13 हजार 385, मारुती सुझुकी 3 हजार 721 आणि VE Commercial च्या 3 हजार 151 वाहनांची विक्री झाली.
याआधी मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यात वाहनांची विक्री फारशी नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या काळात वाहनांना मागणी नव्हती. आता मात्र मागणी वाढत आहे. पण, कंपन्यांकडून ऑटो डीलर्सना योग्य पुरवठा होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. जागतिक पातळीवर सेमिकंडक्टर्सचा अभाव असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा