औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सरकार फार काळ टिकणार नाही, तीन पक्षांचे सरकार लवकरच पडणार अशा बातम्या येत असतात. आताही तशा चर्चा अधूनमधून होत असतात. मात्र, राज्य सरकार दोन वर्षांनंतरही भक्कम आहे. आता या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटत नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केले. राज्य सरकार पडणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी तीन पक्षांचे सरकार पाहता हे सरकार पडेल असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. सरकार आले तसे सरकार पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. भाजप नेते तर हा मुद्दा सातत्याने उपस्थित करत असतात. मात्र, अद्याप तरी तसे काही घडलेले नाही. राज्य सरकारचा कारभार सुरळीत सुरू आहे. तर दुसरीकडे, देशात पुढील वर्षात काही राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपने या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेश या मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुका आहेत. येथे सध्या भाजप सत्तेत आहे. त्यांना या निवडणुका जिंकणे जास्त महत्वाचे आहे. या बरोबरच आणखीही काही राज्याच्या निवडणुका आहेत. त्यासाठीही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.