हे काय बोलले केंद्रीय मंत्री.. म्हणे, अमेरिकेत ठरतात इंधनाचे दर.. केंद्राला दोष देणे चुकीचे
औरंगाबाद : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून एका केंद्रीय मंत्र्यांने सोमवारी केंद्राची बाजू मांडताना एक अजब वक्तव्य केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा संदर्भ देत ते म्हणाले की त्यांच्या किंमती अमेरिकेत ठरतात. त्यामुळे केंद्र सरकारला दोष देणे योग्य नाही.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे, परंतु, महाराष्ट्रासह बहुतांश बिगर भाजपशासित राज्यांनी तेलावरील व्हॅट कमी केलेला नाही. यामुळे ग्राहकांना आणखी दिलासा मिळू शकला असता. परंतु या राज्यांनी हे पाऊल उचलले नाही.
दानवे म्हणाले, भारतातील तेलाच्या किमतीतील अस्थिरतेचा संबंध आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी आहे. मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दानवे यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंधनाचे दर आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनाचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करणे अयोग्य आहे. इंधनाच्या दरवाढीविरोधात देशात निदर्शने होत आहेत. मात्र इंधनाचे दर जागतिक बाजारपेठेशी जोडलेले आहेत. एका दिवशी 35 पैशांनी वाढतो, दुसऱ्या दिवशी एक रुपयाने कमी होतो आणि नंतर पन्नास पैशांनी वाढतो.
अमेरिकेत तेलाच्या किमती निश्चित होत असतात. त्यामुळे इंधन दरवाढीसाठी केंद्राला दोष देणे चुकीचे आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल आणि डिझेलवरील आपला कर कमी केला. परंतु, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारे व्हॅट कमी करण्यास तयार नाहीत, असे सांगितले.