Assembly Election । राज्यात अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे.अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
महायुतीत एकूण 7 मुख्यमंत्री असून फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मनातले नाहीत, शिंदेंसह, फडणवीस आणि अजित पवार तसंच केंद्रातलेही 2 जण असून फडणवीसांचे पाय कापू पाहणारे दोघे जण राज्यातही आहेत, अशी जहरी टीका राऊत यांनी केली आहे. नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनातून अमित शाहांनी नेतृत्व भाजपच सरकार असं सांगून मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे संजय राऊतांनी महायुतीत 7 मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं आहे.
“महायुती सरकारचं सध्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करत आहेत. पण विधानसभेच्या निवडणुका साडे 3 महिन्यावर येताच पुन्हा एकदा अजित पवारांचे बॅनर्स झळकू लागले आहेत आणि भावी मुख्यमंत्री असा आशय लिहिलेला केकही अजित दादा कापत आहेत. भाजपात फडणवीसच प्रमुख दावेदार आहेत. पण अमित शाहांच्या मनात फडणवीस नाहीत, असा निशाणा राऊत यांनी साधला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला अपेक्षित असं यश मिळू शकलं नसल्याने फडणवीसांनी याची जबाबदारी घेत राजीनाम्याची तयारी केली होती. पण पक्षाच्या हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याच्या सूचना केल्या होत्या. आता राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजना आणि घोषणा केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीतील पक्षांनी कंबर कसली आहे.