Asian Games : आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेमध्ये भारताने एकूण 107 पदके जिंकली आहेत. भारतासाठी ही ऐतिहासिक अशीच कामगिरी ठरली आहे. खेळाच्या 72 वर्षांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताला प्रथमच 100 पदकांचा आकडा गाठण्यात यश आले. भारताने या खेळांमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली. भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंनी शनिवारी 12 पदके जिंकली. यामध्ये 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. कबड्डीत 2 सुवर्ण मिळवले. महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीतही 2 सुवर्णपदके जिंकली. यानंतर बॅडमिंटन दुहेरीत सात्विकसाई राज आणि चिरागने सुवर्णपदक पटकावले. भारतीय पुरुष क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकण्यातही यशस्वी ठरला. यापूर्वी 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वाधिक 70 पदके जिंकली होती.
अॅथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक 29 पदके जिंकली. यामध्ये 6 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. नेमबाजीत 22 पदके जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारतीय नेमबाजांनी या गेम्समध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली. एकूण 22 स्पर्धांमध्ये भारताने किमान एक पदक जिंकले. 10 स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले.
बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला प्रथमच बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. तिरंदाजीमध्ये 5 सुवर्णांसह 9 पदके, स्क्वॉशमध्ये 2 सुवर्णांसह 5 तर कबड्डी आणि क्रिकेटमध्ये प्रत्येकी 2 सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 3 पदके जिंकली. याशिवाय टेनिसमध्ये एका सुवर्णपदकासह दोन पदके, घोडेस्वारीत एका सुवर्णापदकासह दोन पदके आणि हॉकीमध्ये एका सुवर्णपदकासह दोन पदके जिंकली. भारताला रोईंगमध्ये 5, बुद्धिबळात 2, कुस्तीमध्ये 6, बॉक्सिंगमध्ये 5, सेलिंगमध्ये 3, रोलर स्पोर्ट्समध्ये 2 तर ब्रिज, गोल्फ, वुशू, कॅनोइंग, सेपकटकरा आणि टेनिसमध्ये प्रत्येकी एक पदक मिळाले.