Asian Games : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने 2023 च्या आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात अंतिम सामना खेळला जात होता. मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने (Afghanistan) 18.2 षटकांत 5 गडी गमावून 112 धावा केल्या. यानंतर पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे होता. या कारणामुळे त्याला विजेता घोषित करून सुवर्णपदक (India) देण्यात आले. यासह ऋतुराज गायकवाड आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
चीनमधील हांगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकांत 5 गडी गमावून 112 धावा केल्या. यानंतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना पुढे जाऊ शकला नाही.
अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने दुसऱ्या षटकात 5 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर नियमित अंतराने संघाच्या विकेट पडत राहिल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अफगाणिस्तानचा संघ फक्त 112 रन करू शकला. यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना पुढे सरकू शकला नाही. भारताला फलंदाजी करता आली नाही. पावसाची परिस्थिती लक्षात घेता सामना सुरू करता येणार नाही याचा अंदाज आल्याने भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. अशा पद्धतीने फलंदाजी न करताच भारताने हा सामना खिशात टाकला.
आशियाई स्पर्धेत भारताला 107 पदके
आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेमध्ये भारताने एकूण 107 पदके जिंकली आहेत. भारतासाठी ही ऐतिहासिक अशीच कामगिरी ठरली आहे. खेळाच्या 72 वर्षांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताला प्रथमच 100 पदकांचा आकडा गाठण्यात यश आले. भारताने या खेळांमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली. भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंनी शनिवारी 12 पदके जिंकली.
यामध्ये 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. कबड्डीत 2 सुवर्ण मिळवले. महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीतही 2 सुवर्णपदके जिंकली. यानंतर बॅडमिंटन दुहेरीत सात्विकसाई राज आणि चिरागने सुवर्णपदक पटकावले. भारतीय पुरुष क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकण्यातही यशस्वी ठरला. यापूर्वी 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वाधिक 70 पदके जिंकली होती.
अॅथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक 29 पदके जिंकली. यामध्ये 6 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. नेमबाजीत 22 पदके जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारतीय नेमबाजांनी या गेम्समध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली. एकूण 22 स्पर्धांमध्ये भारताने किमान एक पदक जिंकले. 10 स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले.