Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2023) उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने पाकिस्तानचा (PAK vs AFG) दणदणीत पराभव केला. अफगाणिस्तानने चीनमधील हांगझोऊ येथील क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर आता अंतिम सामन्यात अफगाणिस्तानला भारताविरुद्ध टक्कर द्यावी लागणार आहे. याआधी भारताने बांग्लादेशचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली आहे.
उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण संघ केवळ 115 धावांत गडगडला. पाकिस्तानकडून सलामीवीर ओमेर युसूफने 19 चेंडूंत 24 धावा केल्या. अन्य फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. ठराविक अंतराने पाकिस्तानच्या विकेट पडत गेल्या. त्यामुळे संघाला कसेबसे 115 धावांपर्यंत पोहोचता आले.
अफगाणिस्तानचीही सुरुवात खराब
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचीही खराब सुरुवात झाली. पहिल्या पाच षटकांत तीन गडी बाद करत पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. अफगाणिस्तानचे सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी मात्र डाव सावरला आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानने 84 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. कॅप्टन गुलबदिन नायबने पाकिस्तानचे मनसुबे उधळले. नायबने 19 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या, तर शराफुद्दीन अश्रफसोबत नाबाद 32 धावांची भागीदारी करत संघाला चार गडी आणि 13 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.
7 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना
शुक्रवारी उपांत्य फेरीत बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केल्यानंतर भारत आता 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत अफगाणिस्तानशी भिडणार आहे. हांगझू येथील क्रिकेट मैदानावर शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.