Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 चा (Asia Cup 2023) अंतिम सामना रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. टीम इंडिया (Team India) आठव्यांदा आशिया चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर दासुन शनाकाच्या नेतृत्वात श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ विजेतेपद राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र, कोलंबोतील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत विजेतेपदाचा सामना पावसामुळे वाहून गेला, तर विजयी संघ कसा ठरवला जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची दाट शक्यता आहे. म्हणजेच सुपर-4 फेरीप्रमाणेच विजेतेपदाच्या सामन्यातही पाऊस येत-जात राहणार आहे. हे लक्षात घेऊन अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजे रविवारी पावसामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर सोमवारीही सामना पूर्ण करण्यासाठी दिवस उपलब्ध असेल.
या राखीव दिवशीह पाऊस आला तर विजेता कसा ठरणार? राखीव दिवशीही पाऊस पडला आणि एकही चेंडू खेळला गेला नाही, तर दोन्ही संघ ट्रॉफी शेअर करतील. नियमांनुसार अंतिम सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी दोन्ही संघांना किमान 20-20 ओव्हर खेळणे आवश्यक आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2023 च्या विजेतेपदाचा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोच्या या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व आहे. मात्र, दुसऱ्या डावात खेळपट्टी निश्चितच थोडी मंदावते. फलंदाजांसोबतच खेळपट्टी फिरकीपटूंनाही खूप मदत करते.