Asia Cup 2023 : आशिया कप सुरू होण्यापूर्वी (Asia Cup 2023) या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना धक्के बसत आहेत. श्रीलंकेनंतर आता बांग्लादेश (Bangladesh) संघाची डोकेदुखी वाढल्याची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज लिटन दास (Litton Das) व्हायरल फिव्हरमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. याच कारणामुळे लिटन संघासह श्रीलंकेत आला नाही. या आजारातून तो अद्याप बरा झालेला नाही. आता दासच्या जागी संघ व्यवस्थापनाने एनामुल हक या खेळाडूला संधी दिली आहे. हक विकेटकीपिंगही करू शकतो.
30 वर्षीय इनामूल हकने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. तो बांगलादेशकडून आतापर्यंत 44 वनडे खेळला आहे. यामध्ये त्याने 30 च्या सरासरीने 1254 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 3 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. या सर्व सामन्यांमध्ये हकने एकतर सलामी दिली आहे किंवा तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. एनामुल हक बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात सामील होणार आहे. बुधवारी तो संघात सामील होणार आहे.
बांगलादेशला लिटनची उणीव भासेल
लिटन दासची अनुपस्थिती बांगलादेशसाठी मोठा धक्का असेल. 28 वर्षीय लिटन हा 2022 च्या सुरुवातीपासून एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यांच्या 25 डावांमध्ये त्याने 42 च्या सरासरीने 878 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचवेळी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 136 धावांची सर्वोत्तम खेळीही केली होती.
बांगलादेशचा संघ 27 ऑगस्टला आशिया कपसाठी श्रीलंकेला पोहोचला होता. त्याला गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. बांगलादेशचा पहिला सामना 31 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्याच वेळी 3 सप्टेंबर रोजी लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भिडणार आहे.