Asia Cup 2022 : पाकिस्तानने (Pakistan) हाँगकाँगवर मिळविलेल्या शानदार विजयानंतर आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 गटातील सामन्यांचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने शुक्रवारी हाँगकाँगवर (Pakistan Beat Hong Kong) 155 धावांनी दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. सुपर 4 मध्ये भारत (India), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश आणि हाँगकाँगला पहिल्या टप्प्यात एकही सामना जिंकता न आल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अ गटातून भारत आणि पाकिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत, तर ब गटातून अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी पुढील टप्प्यात प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान गटात अपराजित राहिले आहेत.
सुपर 4 च्या चार संघांची नावे स्पष्ट झाल्यानंतर अंतिम वेळापत्रकही (Asia Cup super 4 Time Table) समोर आले आहे. या टप्प्यात सर्व संघांना प्रत्येक संघाविरुद्ध राऊंड रॉबिनच्या आधारे एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 मधील पहिला सामना आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे, तर भारत 4 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. म्हणजेच या मालिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा दुसरा सामना असेल. याआधी साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता पुन्हा सुपर 4 मध्ये दोन्ही संघांदरम्यान सामना होणार आहे.
आशिया कप 2022 सुपर-4 वेळापत्रक
3 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका
4 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
6 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
7 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान
8 सप्टेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
सुपर 4 चे सर्व सामने IST संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तुम्ही आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) सुपर 4 स्टेजच्या सर्व सामन्यांचा विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता. त्याच वेळी, हे सर्व सामने लाइव्ह स्ट्रीमिंग आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येतील. तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर भारताचे तीनही सामने पाहू शकता.