Ashadhi Ekadashi। केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी योजना लागू करत असते. ज्याचा सर्वसामान्यांना खूप फायदा होतो. अशातच आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यात विविध योजना लागू केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा केली. यावेळी ते म्हणाले की, “हे सरकार सर्वसामान्यांचे असलयाने सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे”.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ करण्यात आली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर करण्यात आले असून या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता मिळेल. मंदिर समितीचा एमटीडीसी सोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.