APMC Election Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यानंतर आज शनिवारी या समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीचेही निकाल हाती आले आहेत. या बाजार समितीत मतदारांनी आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यावरच विश्वास दाखविला आहे. महाविकास आघाडीने खासदार सुजय विखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या नेतृत्वातील पॅनलचा पराभव केला आहे.
या निवडणुकीत आतापर्यंत 18 पैकी 15 जागा महाविकास आघाडीच्या खात्यात गेल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीत महाविकास आघाडीचीच सत्ता आली आहे. बाजार समिती आधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात होती. बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी खासदार सुजय विखे यांनी चांगलाच जोर लावला होता. यात त्यांना सुजित झावरे यांची साथ मिळाली.
खासदार विखे यांचा तालुक्यातील वाढता हस्तक्षेप पाहता त्यांना तालुक्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी एकमेकांचे विरोधी असलेले आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांनी बाजार समिती निवडणुकीत हातमिळवणी केली.
प्रचार सभांतूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. या ठिकाणी विखे फॅक्टर चालेल असे बोलले जात होते. मात्र, मतदारांनी त्यांना साफ नाकारत लंके-औटी यांच्या नेतृत्वातील पॅनलला कौल दिला.
नगर बाजार समितीत कर्डिलेच किंग
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला कर्डिले गटाच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेता आली नाही. हाती आलेल्या निकालांनुसार बाजार समितीतील 18 पैकी 12 जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. दोन जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. म्हणजे एकूण 14 जागा कर्डिले गटाने मिळवल्या आहेत. बाकीच्या जागांचे निकाल अद्याप येणे बाकी आहे.