नवी दिल्ली : दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या राज्यात आता जिल्ह्यांची संख्या डबल होणार आहे. नवीन जिल्हे तयार करताना राजकीय वाद आणि त्यातून निर्माण होणारे राजकारण अनेक राज्यात पाहण्यास मिळते. या राजकीय वादापायीच अनेकदा जिल्हा विभाजन होत नाही, याचा अनुभव अनेक राज्यांना आहे. मात्र, आंध्र प्रदेशात एक किंवा दोन नाही तर तब्बल 13 नवीन जिल्हे तयार होणार आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने 13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याची संपूर्ण प्रक्रिया अद्याप होणे बाकी आहे. रिपोर्ट्सनुसार, एप्रिलमध्ये तेलुगू नववर्षापर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर राज्यात एकूण 26 जिल्हे होणार आहेत. 24 लोकसभा मतदारसंघांचे जिल्ह्यांमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. विशाखापट्टणममध्ये अराकू लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे जो दोन जिल्ह्यांमध्ये विभागला जाईल. मन्याम, सीताराम राजू, अनकापल्ली, काकीनाडा, कोना सीमा, एलुरु, एनटीआर, बापटिया, पालनाडू, नंद्याल, श्री सत्यसाई, अन्नमय्या, श्री बालाजी अशी नवीन जिल्ह्यांची नावे आहेत.
शेवटच्या वेळी आंध्र प्रदेशात 1979 मध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी आंध्र प्रदेश अविभाजित होता. विजयनगरम जिल्ह्याची निर्मिती 1979 मध्ये झाली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा हा निर्णय 25 जानेवारीला उशिरा आला आहे. त्यानंतर नियोजन सचिव जीएसआरकेआर विजयकुमार यांनी मुख्य सचिव समीर शर्मा यांना शिफारसी सादर केल्या. सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन तेलंगाणा या नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय ठरला आहे.
आंध्र प्रदेशातील या गावात झाले पुष्पा चित्रपटाचे शूटिंग… सुंदर दृश्ये घेतात लक्ष वेधून