China : चीनसोबत तणावपूर्ण संबंधांमध्ये अमेरिकेने (America) तैवानला हार्पून आणि साइडविंडर क्षेपणास्त्रांसह जवळपास USD 1.1 अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्र विक्रीला शुक्रवारी मंजुरी दिली. डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DCSA) ने दोन्ही देशांमधील कराराची खात्री करणारे निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी चीनने (China) संताप व्यक्त करत अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
DSCA ने एका निवेदनात म्हटले आहे, की अमेरिकन परराष्ट्र खात्याने तैवानच्या (Taiwan) संरक्षण क्षमतांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुमारे $355 दशलक्ष हार्पून ब्लॉक II क्षेपणास्त्रे आणि संबंधित उपकरणे विकण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, जवळपास $85.6 दशलक्षसाठी साइडविंडर्स क्षेपणास्त्रे आणि संबंधित उपकरणांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. याशिवाय, US$ 665.4 दशलक्ष किमतीचे पाळत ठेवणारे रडार आणि उपकरणांच्या विक्रीलाही मान्यता देण्यात आली आहे.
DCSA ने असेही म्हटले आहे की प्रस्तावित करारामुळे प्रदेशातील लष्करी संतुलन बदलणार नाही. अमेरिकी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या तैवानच्या वादग्रस्त भेटीवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच हा करार अस्तित्वात आल्याने चीनी राज्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
अमेरिकेच्या या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने सांगितले की चीन याला प्रत्युत्तर देईल. शस्त्रास्त्र पॅकेजबद्दल विचारले असता चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू म्हणाले, की “चीन याला कडाडून विरोध करतो. चीन त्याविरुद्ध कायदेशीर आणि आवश्यक प्रतिकारात्मक उपाय करेल.” प्रवक्त्याने म्हटले की, अमेरिका चीनच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत आहे आणि तैवानला शस्त्रे विकून चीनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा हित धोक्यात आणत आहे.