दिल्ली : विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशा राजकीय पक्षात वेगाने घडामोडी घडत आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज उमेदवारांचे पक्षांतर जोरात सुरू आहे. जवळपास प्रत्येक पक्षात ही परिस्थिती दिसून येत आहे. आताही उत्तराखंडच्या राजकारणात अशीच एक मोठी घटना घडली आहे.
उपसभापती रघुनाथसिंह चौहान यांनी राजीनामा देत पक्षाविरोधात निर्णय घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. तिकीट वाटपानंतर राजकीय पक्षांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. उत्तराखंड निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये इतका असंतोष पसरला आहे की, पक्षाचे सदस्यच पक्षाच्या निर्णयाला उघडपणे आव्हान देत आहेत. अल्मोडा मतदारसंघातील तिकीट वाटपावरून नाराज दिग्गज नेते चौहान, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष ललित लटवाल यांच्यासह डझनभर लोकांनी पक्षाच्या जबाबदारीचा राजीनाम दिला आहे.
रघुनाथ सिंह चौहान यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, की मी परिसराच्या विकासासाठी काम केले, मात्र मला तिकीट न देता पक्षाने 2012 मध्ये पक्षाचा पराभव करण्याचे काम केलेल्या व्यक्तीला तिकीट दिले. चौहान यांनी प्रसारमाध्यमांसमोर पुढे मोठे वक्तव्य केले, ‘मी असेही म्हटले होते की, जर तुम्ही मला तिकीट दिले नाही तर कैलास शर्मा यांनाही तिकीट देऊ नये, पण पक्षाने ऐकले नाही.’ अल्मोडा मतदारसंघातून भाजपने कैलास शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. ललित लाटवाल म्हणाले, की “बहुतेक लोकांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही पक्षाला पाठिंबा दिला. आज पक्षाने आमची फसवणूक केली. आता स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत.
त्याचवेळी एका बड्या नेत्याच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल सुरू केल्याची चर्चा आहे. भाजप जिल्हाध्यक्ष रवी रौतेला यांनी सांगितले की, काही लोक नाराज असल्याची माहिती त्यांना माध्यमांतून मिळाली. हा पक्षांतर्गत मुद्दा असल्याचे सांगून ते म्हणाले की, वरिष्ठांबरोबर चर्चा करुन यावर मार्ग काढण्यात येईल. रौतेला यांनी चौहान यांचा राजीनामा फेटाळला आणि आपल्याला कोणाचाही राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले.