Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण पेटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असतात.
सध्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजितदादा हे यंदा आपले पुत्र जय पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण यावर स्वत: अजित पवारांनी उत्तर दिले आहे. या चर्चा फेटाळून लावत आपण बारामती सोडणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात आलेल्या अपयशानंतर आता आगामी निवडणुकीत अजित पवार हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर तुम्ही बारामती लोकसभेत मी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही साथ दिली नाही तर मी विधानसभा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशा वक्तव्य अजित पवारांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलं होतं.
आता हे वक्तव्य आता त्यांच्या राजकीय विरोधकांकडून व्हायरल केलं जात असून अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता. यावर अजित पवार यांनी खुलासा करत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
बारामतीत अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले असून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे आता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत.