Ajit Pawar Vs Nilesh Lanke | पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे माजी आमदार आणि विद्यमान खासदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धोबीपछाड केले होते. हाच डाव आणखी एकदा झुंजार पद्धतीने खेळत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनाही लंके यांनी धोबीपछाड केले. त्यामुळे अजितदादा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा झटका बसला. तेच खासदार लंके आता दिल्लीत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना चर्चेत आहे. मात्र, आणखी एका गोष्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंके यांना झटका दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याबद्दल लोकसत्ता वृत्तपत्राच्या अहमदनगर आवृत्तीमध्ये विशेष बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार कबड्डी संघटनेचे जिल्हाध्यक्ष खासदार नीलेश लंके यांचे नाव राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूक मतदार यादीतून वगळण्यात आलेले आहे. खासदार लंके यांचे नाव अवैध ठरवले गेल्याने आता उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे. बातमीत म्हटले आहे की, राज्यातील 25 जिल्हा कबड्डी संघटना यांच्यापाडून प्रत्येकी 4 नावे पाठवण्याचा नियम आहे. मात्र, अहमदनगर संघटनेने पाठवलेल्या चारपैकी दोन नावांना अवैध ठरवण्यात आलेले आहे. त्यात लंके यांचेही नाव अवैध असल्याचे म्हटलेले आहे.
अहमदनगर संघटनेने खासदार लंके यांच्यासह सच्चिदानंद भोसले, सुधाकर सुंबे आणि भारती पवार यांची नावे पाठवली होती. त्यावर संघटनेचे माजी सचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव यांनी आक्षेप घेतले होते. त्यानुसार धर्मादाय आयुक्त यांच्या उताऱ्यावर नोंद नसल्याचे कारण देऊन लंके व भोसले यांची नावे अवैध ठरवण्यात आलेली आहेत. यावर अधिक माहिती देताना जिल्हा सचिव शशिकांत गाडे यांनी या निर्णयावर हरकत दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. आता त्याचा काय निकाल लागणार यावर खासदार लंके यांना मतदान करण्याची संधी मिळणार किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.
राज्य कबड्डी संघटनेवर सध्या अजितदादा गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे यानिमित्ताने अजितदादा यांनीच खासदार लंके यांना झटका दिल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही अजितदादा यांनी लंके यांना त्यांच्या शब्दांत ‘समज’ दिली होती. ही त्याचीच प्रचिती तर नाही ना असेही काहीजण म्हणत आहेत.