अहमदनगर – जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाळपासाठी आता साखर कारखाने (Sugar Factory) जास्त दिवस सुरू ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण ऊसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक निर्णय जाहीर केला आहे.
त्यानुसार साखर कारखान्यांचे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी अतिरिक्त ऊसासाठी उस वाहतूक (Sugarcane Transport) अनुदान व उस गाळप अनुदान (Subsidy) मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे 2022 पासून गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरीत केलेल्या ऊसासाठी 50 किलोमीटर अंतर वगळून वाहतूक खर्च (Transportation Charges) प्रति टन प्रति किलोमीटर 5 रुपयेप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अतिरिक्त ऊसाचे जवळच्या साखर कारखान्यांना वितरण करण्यासाठी साखर आयुक्तांनी अतिरिक्त ऊसाचे कार्यक्षेत्र व कारखान्याचे अंतर लक्षात घेऊन त्यांच्या पातळीवर अनिवार्य उस वितरण आदेश द्यावेत.
सर्व कारखाने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसारच ऊसाची वाहतूक करून गाळप करतील, याची खबरदारी साखर आयुक्त कार्यालयाने घ्यावी, असे आदेश दिले आहेत. ज्या कारखान्यांनी 1 मे नंतर शिल्लक राहिलेला उस 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून वाहतूक करून आणला आहे त्या साखर कारखान्यांबाबत साखर आयुक्तांनी साखर कारखाना ते ऊस उत्पादक शेतकऱ्याचे क्षेत्र यामधील अंतराची खात्री करुन सरकारला प्रस्ताव सादर केल्यानंरतच अनुदान मंजूर होईल, असेही राज्य सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात अजूनही जवळपास एक लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस गाळप करण्याचे नियोजन केले असून साधारण 15 जूनपर्यंत सर्व ऊसाचे गाळप होईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. तसे पाहिले तर यंदा ऊसाचे उत्पादन जास्त असल्याने ही परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात अतिरिक्त ऊस आहे. हा ऊस गाळप करण्याचे आव्हान साखर कारखाने आणि राज्य सरकारसमोर आहे.
ऊसतोडणी कामगारांसाठी महत्वाची बातमी : पहा नेमकी कशी आणि केंव्हा नोंदणी करून मिळणार योजना