अहमदनगर – आपल्याकडे समोसा या खाद्यपदार्थास मोठी मागणी आहे. सकाळी नाश्त्यावेळी बहुतेक लोक समोसा खातात. नाश्त्यासाठी वेळ नसेल तर अशावेळी समोसा असतोच. इतकेच नाही तर समोसा तितकाच टेस्टी सुद्धा आहे. त्यामुळे या खाद्य पदार्थास सर्वाधिक मागणी आहे. तुम्ही नेहमीच्या पद्धतीचे समोसे अनेकदा पाहिले असतील पण तुम्ही कधी समोसा रोल पाहिला आहे का, समोसा रोल बनवून तुम्ही नाश्त्यासाठी वेगळे काहीतरी तयार करू शकता. या पद्धतीचा समोसा तयार करणे फार अवघड नाही. आम्ही तुम्हाला समोसा रोल बनवण्याची पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वेळात समोसा रोल बनवू शकता.
साहित्य- मैदा 3 कप, उकडलेले बटाटे 5-6, जिरे अर्धा चमचा, ओवा 1 चमचा, अमचूर पावडर अर्धा चमचा, हिरव्या मिरच्या 2-3, गरम मसाला 1 चमचा, कॉर्न फ्लोअर 1 चमचा, कोथिंबीर 2 चमचे, हिंग चिमूटभर, तेल, मीठ चवीनुसार.
रेसिपी
समोसा रोल करण्यासाठी प्रथम सर्व पीठ एका भांड्यात ठेवा. आता ओवा मीठ आणि दोन ते तीन चमचे तेल टाकून मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी टाकून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठ कापडाने झाकून तासभर बाजूला ठेवा. आता बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या. यानंतर बटाटे एका भांड्यात मॅश करा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि चिमूटभर हिंग टाकून तळून घ्या. काही सेकंदांनंतर त्यात बारीक केलेली हिरवी मिरची आणि बटाटे यांचे मिश्रण टाकून चांगले मिसळून घ्या. यानंतर गरम मसाला आणि कॉर्नफ्लोअर टाकून मिसळून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मिश्रण तळून घ्या. त्यात हिरवी कोथिंबीरही टाका. अशा प्रकारे समोसा रोलसाठी तुमचे स्टफिंग तयार आहे.
आता मळलेले पीठ घेऊन त्यावर थोडे तेल लावून परत एकदा मळून घ्या. आता त्याचे समान प्रमाणात गोळे बनवा. आता एक गोळा घ्या आणि त्याला लांब आकार द्या. यानंतर ते कट करुन एका भागात बटाटा मसाला ठेवून रोल करा. यानंतर शेवटच्या भागावर पाणी लावून रोल चिकटवा. याच पद्धतीने सर्व रोल तयार करून एका मोठ्या थाळीत बाजूला ठेवा. आता एका कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात समोसे रोल टाकून तळून घ्या. रोलचा रंग सोनेरी होऊन कुरकुरीत झाल्यावर प्लेटमध्ये बाहेर काढा. या पद्धतीने सर्व समोसे रोल तळून घ्या. तुमचे स्वादिष्ट समोसे रोल तयार आहेत.
Todays recipi : संध्याकाळच्या नाश्त्यात तयार करा टॅको समोसा.. मुलांनाही आवडेल