अहमदनगर : पालक हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असते हे आपणा सर्वांना माहीत आहे. विशेषतः हिवाळ्यात पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. पालकाची भाजी तर आपल्याकडे घराघरात तयार होते. मात्र, पालकापासून आणखीही स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करता येतात. पालक पनीर, पालक भजे हे पदार्थही आपण नेहमीच पाहतो. मात्र, आता पालकापासून आणखीही एक स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करता येतो, ज्याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पालक कबाब तुम्ही कधी तयार केले नसतील तर हा एक वेगळा खाद्य पदार्थ आहे. पालक कबाब तयार करायलाही सोपा आहे. तसे पाहिले तर पालकामध्ये 23 कॅलरीज, 91% पाणी, 2.9 ग्रॅम प्रथिने, 3.6 ग्रॅम कार्ब, 2.2 ग्रॅम फायबर आणि 0.4 ग्रॅम फॅट असते. याशिवाय जीवनसत्वे लोह आणि कॅल्शियम देखील पालकामध्ये आढळते.
साहित्य-पालक, काजू, जिरे पावडर, हिंग, कोथिंबीर, ओवा, तेल, दही, डाळीचे पीठ, मीठ.
रेसिपी
सर्व प्रथम एका भांड्यात बारीक केलेल काजू, जिरेपूड, हिंग आणि कोथिंबीर एकत्र करून सारण तयार करा. कढईत थोडे तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाका, नंतर बारीक केलेला पालक टाकून काही मिनिटे परतून घ्या. एका भांड्यात काढा आणि त्यात दोन चमचे दही, बेसन आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिसळून घ्या. मिश्रण घ्या आणि त्याला गोल आकार द्या, सारण मध्यभागी ठेवून ते चांगले कव्हर करुन घ्या आणि पॅनमध्ये थोडे तेल टाकून तळून घ्या, त्यानंतर तुमचा टेस्टी पालक कबाब तयार आहे, तुम्ही ते चटणी आणि चहा-कॉफीसोबत सर्व्ह करू शकता.
खास पाहुण्यांसाठी तयार करा व्हेज गलोटी कबाब.. या रेसिपीसह घ्या शाही चवीचा आनंद