Take a fresh look at your lifestyle.

IMP : तर कुकडी-मुळा-सीना शृंखला योजना ठरणार नगर-बीडसाठी वरदान

अहमदनगर : महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक अवर्षणप्रवण भाग असूनही नगर दक्षिण जिल्हा आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील आष्टी भागाचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या यासाठी आग्रही भूमिका घेतली न गेल्याने १९९९ च्या माधवराव चितळे आयोगाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष झाले आहे. सखाळाई योजनेसह घोसपुरी, शहांजापूर, दशाबाई आणि मुळा नदीतून पारनेरच्या उत्तर भागात उपसा जलसिंचन प्रकल्प राबवण्याची गरज चितळे यांच्या महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने केली होती. त्याकडे आज जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व द भोर फाउंडेशनचे संचालक जगन्नाथ भोर यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

भोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वाधिक डोंगराळ आणि उंच असलेल्या नगर दक्षिणेच्या अवर्षणप्रवण भागात उपसा जलसिंचन योजना राबवणे आवश्यक आहे. कृष्णा व गोदावरीच्या खोऱ्याचे जलदुभाजक असलेल्या नगर, पारनेर, श्रीगोंदा आणि आष्टी (जि. बीड) या भागातील दुष्काळाला मूठमाती देण्यासाठी सिंचन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार कुकडी-मुळा-सीना शृंखला योजना राबवणे आवश्यक आहे. अनियमित आणि अवेळी पडणाऱ्या पावसाच्या भागात पाणी आणण्यासाठी राजकीय व सामाजिकदृष्ट्या सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. सिंचन आयोगाने शिफारस केल्यानुसार तुकाई योजना (कर्जत व जामखेड तालुका) आणि भोसे खिंड प्रकल्प (श्रीगोंदा व आष्टी भागातील सीना आणि मेहकारी नदीचा प्रदेश) राबवण्यात आलेले आहेत. असेच प्रयत्न आता कुकडी-मुळा-सीना शृंखला योजना यासाठी आवश्यक आहेत.

Advertisement

‘जलसमृद्धी’ या विषयावर अहमदनगर येथे मास्टर माइंड करिअर अकादमीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संगणक स्क्रीनवर प्रेझेंटेशन करून भोर यांनी आयोगाने बनवलेले नकाशे, नगर जिल्ह्यासाठी केलेल्या शिफारशी, त्याकडे झालेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले. यावेळी हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे, खातगावचे सरपंच मिठू कुलट, भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर यांच्यासह नगर, पारनेर आणि आष्टी तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत कार्यकर्तेही उपस्थित होते. या योजनेद्वारे पारनेर, नगर, श्रोगोंदा आणि आष्टी तालुक्यातील सुमारे १०० गावात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला मूठमाती देणे शक्य असल्याकडे भोर यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply