अहमदनगर : हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि वाटाणा यांना मोठी मागणी असते. या दोन्हींपासून सहसा भाजी तयार केली जाते. गाजराचा हलवाही तयार केला जातो. तर वाटाणे शक्यतो भाजीसाठी वापरले जातात. मात्र, वाटाण्याचा उपयोग करुन आणखीही काही गोड आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थ तयार करता येतात, हे तुम्हाला माहिती आहे का, नाही ना. तर मग, आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक खास डिश घेऊन आलो आहोत. तुम्ही वाटाण्यापासून जशी मसालेदार आणि स्वादिष्ट कचोरी तयार करू शकता तसेच गोड मटर बर्फीही तयार करू शकता. ही बर्फी चविष्ट तयार होते. त्यामुळे जाणून घ्या काही मिनिटांत घरच्या घरी मटर बर्फी कशी तयार करू शकता.
साहित्य- मटार 250 ग्राम, दूध 2 कप, पिठी साखर 4 चमचे, खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर, तूप 1 चमचा, मावा 250 ग्रॅम, काजू 8-10, वेलची पूड 1/4 चमचा.
रेसिपी
वाटाणे दुध आणि 2 चमचे साखर टाकून बारीक करा. कढईत तूप गरम करून त्यात वाटाणे टाका आणि घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहा. मिश्रण पॅनच्या बाजूने निघेपर्यंत शिजू द्या. हिरवा रंग मिक्स करून ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये पातळ पसरवा. उरलेल्या साखरेसोबत मावा भाजून घ्या आणि वेलची पूड त्यामध्ये मिसळा. आता मटारच्या मिश्रणावर माव्याचे मिश्रण पसरवा. थंड झाल्यावर चौकोनी तुकडे करा. प्रत्येक तुकड्याच्या वरती काजू टाकून सर्व्ह करा. अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी वेळात वाटाण्यापासून टेस्टी आणि हेल्दी बर्फी तयार करू शकता.
वेगळे काहीतरी : हिवाळ्यात घरी तयार करा वाटाण्याची कचोरी; जाणून घ्या, ही आहे सोपी रेसिपी