अहमदनगर : सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गेणू रामकिसन दरेकर यांना राजस्थानमधील ‘ओपीजेएस’ विद्यापीठाच्या वतीने डी. लिट. (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर) ही पदवी देऊन नुकतेच गौरविण्यात आले. अशी पोस्ट डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारे डॉ. दरेकर हे तालुक्यातील व महाविद्यालयातील पहिलेच शिक्षक आहेत. डॉ. दरेकर हे वाळुंज (ता. जि. अहमदनगर) या दुष्काळी गावातील रहिवाशी आहेत.
ग्रामीण भागात पाण्याचे चटके आणि शहरी भागात पाण्याची उधळण हे भीषण वास्तव समोर ठेवून त्यांनी ‘सोशिओ-इकॉनॉमिक कॉस्ट अॅनालिसिस ऑफ रिसायकलिंग ड्रेनेज वॉटर वुईथ स्पेशल रेफ्रन्स टू पुणे डिस्ट्रिक्ट’ या विषयावरील शोधप्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सादर केला होता. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून मुळा-मुठा नदीत प्रचंड प्रमाणात रसायन व मैलामिश्रीत पाणी सोडले जाते. त्यामुळे पिंपरी ते उजनीपर्यंतचे जलस्त्रोत बाधित होऊन नागरिकांना जबर किंमत मोजावी लागते. त्याऐवजी पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर केल्यास धरणबांधणीपेक्षा कमी खर्चात प्रकल्प होऊ शकतो याचा उहापोह त्यामधे केला होता. याच विषयात नव्याने जगभरात झालेल्या कामाची भर घातली आणि पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय उपाययोजना करू शकते याची भर घातली. सदर शोधप्रबंध देशपातळीवर दखल घेतली जावी यासाठी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील ‘ओपीजेएस’ विदयापीठाला पोस्ट डॉक्टरेटसाठी सादर केला होता. सदर विद्यापीठाचे कुलपती डॉ. जोगिंदर सिंग, कुलगुरू डॉ. कश्यप यांच्या हस्ते डी लिट देऊन गौरविण्यात आले. डॉ. प्रकाश दिवाकरन यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव प्रा. जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, प्रभारी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी अभिनंदन केले.