Take a fresh look at your lifestyle.

पालकमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांच्या पैजा..! मंत्री तनपुरे यांच्यासह लंके, पवार, जगतापांचीही चर्चा

अहमदनगर : सध्या राज्यभरात करोनाची तिसरी लाट आल्यावर लॉकडाऊन लागू होणार की नाही याचीच भ्रांत सामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना पडली आहे. अशावेळी राजकीय कार्यकर्त्यांना मात्र आपल्या नेत्यांना कोणते पद मिळणार आणि त्यामुळे आपल्याला कशी लॉटरी लागणार याचीच काळजी आहे. हे कुठे उत्तरप्रदेश किंवा बिहारच्या भागातील चित्र नाही; तर हे अहमदनगर जिल्ह्यातील चित्र आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकडे लक्ष देण्यासाठी म्हणून पालकमंत्री सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याची बातमी चर्चेत आहे. अशावेळी आपल्याच नेत्याला हे महत्वाचे पद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी आस लावली आहे.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्याचे हे महत्वाचे पद आपल्या नेत्यालाच मिळणार असे सध्या कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत. राहुरी-पाथर्डी-नगरचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच हे पद मिळण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे. तर, मंत्रिमंडळ विस्तार होऊन नगर जिल्ह्याला आणखी एक-दोन मंत्रिपद मिळण्याची आस ठेऊन काही आमदार वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत. सिनीअर हा निकष ठेऊन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनाच राष्ट्रवादीकडून संधी मिळेल असे शहरातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. युवा आणि तरुणांमध्ये लोकप्रियता हा घटक आमदार जगताप यांच्यासाठी महत्वाचा मनाला जात आहे. नगर शहरातील विकासाला गती देण्यासाठी म्हणून मोठ्या निधीची गरज आहे. पालकमंत्री म्हणून आमदार जगताप यामध्ये नक्कीच यश मिळवतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

Advertisement

तर, नव्या दमाचे आणि राज्यभरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून विकासाचा चेहरा म्हणून कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नातू म्हणूनही रोहित दादांना संधी नक्कीच मिळणार असे अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना वाटत आहे. झेंडा उभारून रोहित दादांनी थेट मुख्यमंत्री पदाची पायाभरणी केल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार होणार आणि दादांच्या गळ्यात मंत्रिपद आणि पालकमंत्री असी दुहेरी जबाबदारीची माळ पडणार असाच त्यांच्या चर्चेचा सूर आहे. याचबरोबर करोनाच्या काळात केलेल्या कामातून राज्यभरात धडाकेबाज आमदार म्हणून पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. लंके यांनी लोकनेते अशी उपाधी मिळवून आता मंत्रिपदावर दावा करण्याची तयारी केल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. पायाला भिंगरी लावून फिरताना निलेश लंके प्रतिष्ठान याच्यामार्फत त्यांनी मोठे संघटन उभे केले आहे. त्याचाच फायदा त्यांना मंत्रीमंडळ विस्तारात होईल आणि मग अलाहिदा त्यांना पालकमंत्री हे पद मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. एकूणच या एका पदावर एका पक्षाच्या चार युवा शिलेदारांनी तयारी केल्याचे चित्र आहे. त्यातून ही संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply