पुणे : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी नगर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. थंडी जाणवत होती. त्यानंतर सायंकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आज गुरुवारी सकाळीही पाऊस सुरू आहे. या व्यतिरिक्त राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरात बुधवारी पावसाळ्यासारखी परिस्थिती होती. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात असलेली चक्रीय वातप्रणाली आणि गुजरात राज्यातील कच्छपर्यंत निर्माण झालेले ढगाळ हवामान यांमुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. या हवामानाचा प्रभाव उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र परिसरात जास्त होता. पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. पुण्यातही बुधवारी दिवसभर पावसाचा जोर होता. थांबूनथांबून सरी कोसळत होत्या. रात्री 8.30 वाजेपर्यंत 33.8 मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. अनेक वर्षांनंतर पुणेकरांना बुधवारी पाऊस, थंडी आणि धुके असा तिहेरी वातावरणाचा अनुभव मिळाला.
नगर शहरातही काल दिवसभर ढगाळ हवामान होते. गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवत होती. अधून मधून पाऊसही येत होता. सायंकाळी मात्र अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आज गुरुवारी सुद्धा हवामानात बदल झालेला नाही. नगर शहरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. तसेच थंडी नेहमीपेक्षा जास्त जाणवत आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी असेच वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, आज गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 3 डिसेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे.