Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : संशोधक, लेखक व वक्ता असलेला ‘मोठा माणूस’ म्हणजे डॉ. अशोक शिंदे..

गेल्या दीड वर्षापासून सर्व मानवी समाज भयग्रस्त व धास्तावलेल्या अवस्थेतून जात आहे. जीवनाचं असे एकही क्षेत्र अथवा अंग नाही की जे या महाभयंकर अशा एका विषाणूने प्रभावित झाले नाही. संपूर्ण मानवी जीवनावरच याचा परिणाम झाला. प्रेम, विश्वास, आपुलकी, माणुसकी हे शब्द नाहीसे होतात की काय अशी सर्वांना भिती वाटायला लागली. माणसातल्या माणुसकीऐवजी माणसातला राक्षस अधोरेखित होऊ लागला. अफवांना ऊत आला. या कोविडनं आपल्यापैकी अनेकांच्या जवळच्या माणसांना, नातेवाईकांना, मित्रांना कायमचं नेलं. यामध्ये डॉ. अशोक शिंदे यांच्यासारखे एक उत्तुंग चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व हरपले. आणि एक दुखरी नस कायम ठस-ठसत राहीली.

Advertisement

लेखक : प्रोफेसर डॉ. शिवाजीराव देशमुख, सोलापूर (मो. ९४२३०६७२८०)

Advertisement

त्यांच्या जाण्याने आमच्यासारखे असंख्य मित्र, स्नेही गहिवरले. शिक्षण क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले! एक ज्ञानयोगी आणि कर्मयोगी आमच्यामधून निघून गेले. आमच्यासारख्यांची हृदय कमळे फुलूवून जीवनात प्रबोधनाचे वारे निर्माण करणारे संशोधक, लेखक, वक्ते गेले. आपल्या विलोभनीय स्वभावाने सर्वांना वेड लावणारा एक ‘मोठा माणूस’ निघून गेला. त्यांच्या या मोठेपणाचा ज्यांना ज्यांना अमृतस्पर्श झाला ते ते सर्वजण दुःख सागरात बुडून गेले. आज एक वर्षानंतर जुन्या स्मृती पुन्हा अत्तराच्या कुपीसारख्या आहेत. एक उदात्त, उत्तुंग आणि उदार व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना कारुण्य आणि कृपा यांच्या समन्वयाने रसरसलेल्या या आठवणी आजही आम्हांस प्रेरणादायक आहेत. प्रेम, प्रेरणा आणि प्रसन्नतेने त्या भरलेल्या आहेत.

Advertisement

प्राचार्य अशोक शिंदे आणि माझा परिचय १९९५ पासूनचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उजळणी वर्गाला असताना परिचय झाला. डॉ. शिंदे हे जातिवंत शिक्षक. ग्रामीण भागात राहून त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयांत शिक्षण घेऊन तेथेच जवळपास ३८ वर्षे अध्यापन केले. आपल्या आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी वर्गात व मित्रपरिवारात एक आदराचे स्थान मिळविले होते. शिंदे सरांनी स्वतःच्या विद्वत्तेची आणि वक्तृत्वाचे छाप केवळ विद्यार्थी व वर्गात नव्हे तर सामान्य जनातदेखील निर्माण केलेली होती. ह.भ.प. बन्सी महाराजांचा सहवास त्यांना लागला होता. संत साहित्यावर, वारकरी संप्रदायावर अनेक व्याख्याने, प्रवचने त्यांनी दिली.

Advertisement

दोन वेळा उस्मानाबाद व तुळजापूरच्या महाविद्यालयात त्यांची झालेली व्याख्याने ऐकणे हा एक हृदयंगम असा आमचा अनुभव आहे. लोकांना हसवत ठेवून त्यांच्या मनात ज्ञानाचे स्फुल्लिंग निर्माण करण्याची कला त्यांना अवगत झालेली होती. त्यामुळे त्यांचे व्याख्यान चैतन्याने फुललेले असेच होत असे. त्यांच्या व्याख्यानात प्रज्ञा,  प्रतिभा आणि प्रसन्नता यांचा सुंदर मिलाफ झालेला असायचा. मी आयोजित केलेल्या उस्मानाबाद, तुळजापूर, लोणी काळभोर येथील महाविद्यालयातील चर्चासत्रामध्ये याची अनुभूती आली.

Advertisement

पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष ते अधिष्ठता.. शिवाय सोनई व नेवासा येथील प्राचार्य पदाची त्यांची कारकीर्द, भूमिका दूरगामी व लोभस होत्या. ते समृद्ध, समर्पित जीवन जगले. विद्यार्थ्यांना भरभरून विद्यादान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. १५ विद्यार्थ्यांनी एम. फिलची पदवी संपादन केली. बहुजन समाजातील अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले, संशोधक बनवले. हे अनेक विध्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगल्या प्रकारे मुळा एज्युकेशन सोसायटीत काम केले. तेथे त्यांनी विद्यार्थ्यावर प्रचंड प्रेम केले. ज्या  परिस्थितीतून आपण आलो, शिकलो, मोठे झाल़ो, त्याची त्यांना जाणीव होती. ती त्यांनी अखेरपर्यंत सतत जागती ठेवली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याबद्दल त्यांना आपुलकी आस्था वाटे.

Advertisement

ते त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारित. त्यांनी या मुलांना विश्वास दिला. माझ्या यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावरील संशोधन प्रसंगी याची प्रचिती आली. त्यामुळे गुरू-शिष्याच्या नात्याची ही वीण अखेरपर्यंत घट्ट राहिली. डॉक्टर शिंदे सरांची स्मरणशक्ती आश्चर्यकारक होती. ते चारोळ्या,  अभंग आणि सुभाषितांचा वापर बोलताना सहज करत. संत काव्यातील सात्विकता, पंत काव्यातील भावुकता आणि तंत काव्यातील उत्कटता यांच्या संस्कारातून त्यांचे लेखन व वक्तृत्वाचे भरण-पोषण झालेले होते. ते वारकरी व विठ्ठल भक्त होते. त्यामुळे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापुरला ते सदैव येत असत. गोरोबा काकांच्या दर्शनासाठी कधी तेरला जात. येण्यापूर्वी ते मला आगाऊ कल्पना देऊन सोलापूरला माझ्याकडे मुक्काम करत. विविध विषयावर चर्चा होत.

Advertisement

एकीकडे त्यांच्या विचारात परंपरेचा अभिमान होता. तर दुसरीकडे नवतेच्या स्वागताची तोरणे त्यांच्या विचारात असत. बदलत्या काळाला सामोरे जाणारे खूप प्रतिभावंत असतात. पण त्या काळातले चांगले वाईट स्वीकारताना स्वतःतला लेखक प्रतिभावंत त्यांनी हतबल होऊ दिला नाही. शिक्षणामध्ये संशोधनाकडे लक्ष दिले पाहिजे. संशोधन ही शिक्षणाची उच्च पातळी असते. संशोधनाचा उपयोग प्रश्न सोडविण्यासाठी व अडचणीवर मात करण्यासाठी झाला पाहिजे. अनुभवाने संशोधनामध्ये भर पडते. संशोधन मौलिक विषयावर झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. शिक्षणात स्वातंत्र्य व स्वायत्तता असावी, प्रयोगशीलता व उपक्रमशीलता यांना अवसर असावा. माणसाने हव्यासाच्या मागे लागू नये. हव्यास माणसाची गरज झाली की तो, नको त्या गोष्टीचा ध्यास घेतो. आणि हव्यास त्याच्या विनाशाचे कारण ठरते. माणसाला आपले जीवन नंदनवन व्हावे, ते ओसाड होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी मोह वा आसक्तीच्या आहारी जाऊ नये.  माणसाने जीवनामध्ये कसे वागावे व कसे वागू नये आणि समाजाची बांधणी कोणते मूल्ये आणि तत्वे यांच्या आधारे करावी या संबंधी त्यांनी मांडलेले विचार  उद्बोधक होते.

Advertisement

या अध्यात्मिक प्रवृत्तीच्या प्रतिभावंताने आपल्या विचारातून अनेकांच्या मनावर फुंकर घातली. या प्रतिभावंताने कधीही मोठ्या व्यासपीठाची मागणी केली नाही. समीक्षकांच्या आभिप्रायाची अपेक्षा न बाळगत, वाटचाल, संत कृपा, मायबोली, साईकृपा नेवासा क्षेत्र, दीपस्तंभ, आनंदाच्या डोही आनंद तरंग, चैतन्य चांदणं, यासारख्या विविध विषयावर सतरा ग्रंथ, आठ संपादित ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. ते वाचकांच्या पसंतीस उतरले. पुरस्काराच्या वार्तेची त्यांनी कधी वाट पाहिली नाही. तरीही आदर्श शिक्षक पुरस्कार ते समाजरत्न पुरस्कार यासारख्या पंचवीस-तीस पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. जिथे अगत्यपूर्वक बोलावले गेले तिथे ते गेले. महाराष्ट्रभर संचार त्यांनी केला. ज्यांनी विचार ऐकविण्याची मनःपूर्वक प्रेमळ विनंती केली त्यांना त्यांनी आपले विचार ऐकवले. व्यासपीठावरील वक्ता आणि प्रत्यक्ष जगण्यातला वक्ता यात नेहमीच महदंतर प्रत्ययाला येते. प्राचार्य शिंदे याला अपवाद होते. ते अंतर्बाह्य निर्मळ आणि सच्चा माणूस होते. प्रतिभा हीच श्रीमंती. विचार हेच ऐश्वर्य. जोडलेली माणसे हीच संपत्ती. अशा आजच्या काळातील भाबड्या वाटाव्यात अशा श्रद्धांवर जगणारा तो सच्चा माणूस होता.

Advertisement

माणसे वयाने व पदाने मोठी होताना जड होतात. प्राचार्य शिंदे ‘राखावी बहुतांची अंतरे’वाले होते. वाचन, व्यासंग, चिंतन, अभ्यास, श्रद्धा त्यांच्या शब्दांमध्ये उसळत होती. त्यांनीं स्वतःच्या कर्तुत्वाने अनेक विद्यापीठामध्ये एक सिद्धहस्त लेखक, प्रामाणिक लोकशिक्षक, प्रवचनकार, वक्ता अशी एक अमीट प्रतिमा निर्माण केली आहे. एक ज्ञानवंत शिक्षक, जातिवंत  वक्ता आणि भाग्यवंत माणूस असे डॉ. शिंदे जगले, बोलले आणि वागले. समता, सद्भाव, सहयोग, सेवा, सत्कार्य आणि सद्भावना ही त्यांची शिकवण. ‘ऐसी कळवल्याच्या जाती, करी लाभावीन प्रीती’ अशी त्यांची जगण्याची रीत होती. ‘असाध्य ते साध्ये, करिता सायास, कारण अभ्यास’ हे त्यांचे जीवनवृत्त होते. ‘भुतां परस्परे जडो, मैत्र जीवाचे’ हे त्यांचे जीवन संगीत होते. ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत’ या ध्येय-ध्यासाने ते जगत होते. अशा निर्मोही, निर्लोभी, नि:स्पृह, निष्कपट, नीरहंकारी, नि:स्वार्थी व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन.

Advertisement
Advertisement
1 Comment
  1. महेबूब सय्यद says

    डॉ. अशोकराव शिंदे यांच्या बद्दल नवीन माहिती वाचायला मिळाली. धन्यवाद।

Leave a Reply