अहमदनगर : शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत असते. आताही अहमदनगर तालुक्यातील शेतकरी महसूल आणि कृषी विभागाच्या अनास्थेच्या फेऱ्यात वैतागलेले आहेत. त्यामुळेच महसूलदारांच्या कृपेने सध्या शेतकऱ्यांना त्यांचे पिक वाचवण्यासाठी थेट उपोषणाचे हत्यार उपसावे लागलेले आहे.
खडी क्रशर मधून बाहेर पडणाऱ्या धुळी मूळे शेती करणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांना उपोषण करावे लागत आहे. प्रशासनाला वारंवार कळवुनही प्रशासन लक्ष देत नाही.त्यामुळे अरणगाव मधील शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनापासून शेतातच उपोषणाला सुरुवात केली आहे. दौंड रस्त्यावरील अरणगाव आणि खंडाळा येथील खडी क्रशरच्या धुळीमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. ८० ते ९० एकर जमीन नापीक झाली आहे.
अरणगाव महसूल हद्दीत ६ क्रशर तर खंडाळा हद्दीत असणाऱ्या १० पेक्षा जास्त क्रशर मुळे परिसरातील ८० ते ९० एकरांपेक्षा जास्त शेती नापीक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात २०२० पासून शेतकरी संघर्ष करत आहेत. २०२० मध्ये केलेल्या आंदोलनावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पूर्तता झालेली नसल्याने अखेरीस शेतकरी उपोषणास बसलेले आहेत. अरणगाव ग्रामपंचायतने हद्दीत खडी क्रशर सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव ग्रामसभेत करूनही ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे खडी क्रशर चालकांना ना हरकत दिल्या आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
वीज चोरी, रॉयल्टीपेक्षा जास्त क्रसिंग असे अनेक अवैध उद्योग येथे चालतात.पण तहसीलदार, प्रांताधिकारी, तलाठी ,मंडलाधिकारी यांचे खडी क्रशर चालकांशी आर्थिक लागेबांधे असल्याने शेतकऱ्यांनाच्या प्रश्नांकडे आणि रॉयल्टी आणि वीज चोरीकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नारायण पवार (शेतकरी अरणगाव) यांनी केला आहे. दरम्यान, सारोळा कासार आणि घोसपुरी हद्दीत शेततळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. त्यासाठी मोठे ब्लास्ट केले जात आहेत. त्यामुळे अनेक घरांना तडे गेले असून अनेक विहिरी आणि बोअरवेल यांचे पाणी गेले आहे. अवैध वाहतूक आणि खानमालक शेतकऱ्यांना दहशत करतात. तक्रार करूनही प्रशासन गप्प आहे. या अवैध उत्खननावर दंडात्मक कारवाई करून ते बंद करावेत यासाठी सारोळा कासार ग्रामस्थ देखील आता आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.