Ahmednagar Politics । म्हणून शिक्षक मतदारसंघात दराडे यांचा विजय; विखे गटाचा महत्वपूर्ण दावा व्हायरल

Ahmednagar Politics । मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक निकालात आमदार किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. असे असले तरी ही खरी लढाई विद्यमान महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातच लढली गेली. थोरात यांनी आघाडी धर्म न पाळता सगळी ताकद अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मागे उभी केली. हे निकालातुन ही स्पष्ट होत आहे.

आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यामागे ‘दगा फटका’ करत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना सगळी रसद दिली असल्याने विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकापर्यत गेले. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, रोहित पवार यांनीही कोल्हे यांनाच मदत केल्याचे दिसते. विशेष म्हणजे मतदानाच्या काही तास आधी कोल्हे यांच्यासाठी शिवसेना (उबाठा गट) यांचे उमेदवार गुळवे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आघाडीतील नेत्यांनी केल्याने आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

जरी संदीप गुळवे यांच्या मागे ही गद्दारी झाली नसती तरी गुळवे यांचा विजय नक्की झाला असता. गुळवे यांच्या पराभवाने महाविकास आघाडीच्या एकतेला हा पहिला तडा गेला आहे. विधानसभा निवडणुकीत पण असेच होणार याची ही रंगीत तालीम म्हणावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजुला आपले बंधु राजेंद्र विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युती धर्म पाळल्याचे पाहायला मिळाले आहे.

यातच आमदार दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे. जिल्हात विखे पॅटर्नला लोकसभा निवडणुकीनंतर आलेली मरगळसुद्धा त्यांनी या विजयाने दुर केली असून प्रवरा आणि प्रवरा परिवारातील सहकारी संस्थाची सुमारे 10 हजार मते आमदार दराडे यांच्या पारड्यात टाकुन विखे यांनी एक हाती निकाल फिरवला. अपक्ष उमेदवार कोल्हे यांनाही नगर जिल्ह्यातच रोखले असल्याने मतमोजणी आधीच विजयाचे बॅनर लावलेल्या कोल्हे यांना तोंडघशी पडावे लागले.

या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्म न पाळल्यामुळे खासदार संजय राऊत आणि थोरात यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थोरात यांच्या या वागण्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली असून दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्ष नेतृत्वाला बरोबर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवधनुष्य अधिक बळकट केले आहे.ता. क- दुसऱ्याच्या वरतीत नाचणाऱ्यांची कधी कधी स्वतःच्या लग्नाची ही अडचण होते, हे विखे गटाच्या कार्यकर्त्याचे एक स्टेट्स आज भाव खाऊन गेले

Leave a Comment