Ahmednagar Lok Sabha : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha) सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत होत आहे. दोन दिवसांपूर्वी सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने त्यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर निलेश लंके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली.
स्वाभिमानी जनसंवाद यात्रा विविध गावात जाणार आहे. यानंतर या यात्रेचा समारोप नगर शहरातील विशाल गणपती मंदिरात 16 एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी लंके यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली.
Ahmednagar Lok Sabha
उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. या भेटीत थोरात यांनी निवडणुकीत पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन लंके यांना दिले होते. तसेच आगामी निवडणुकीबाबत चर्चाही केली होती. आता स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत तसेच त्यांचे प्रश्नही जाणून घेणार आहेत.
ही जनसंवाद यात्रा 1 ते 4 एप्रिल दरम्यान शेवगाव विधानसभा मतदारसंघात राहील. त्यानंतर 5 ते 8 एप्रिल रोजी राहुरी, नगर विधानसभा मतदारसंघात येणार आहे. तर 9 ते 11 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत कर्जत-जामखेड मतदारसंघात यात्रा राहील. तिथून पुढे 12 ते 14 एप्रिल या दोन दिवसात यात्रा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रवास करील आणि 15 ते 16 दरम्यान ही यात्रा नगर शहरात असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Ahmednagar Lok Sabha
Nilesh Lanke : लंकेंना थोरातांची साथ; तिकीट मिळताच संगमनेरात घेतली भेट, चर्चा काय?
दरम्यान, या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे असे म्हणता येईल. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यावेळी ही लढत अटीतटीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे तर महाविकास आघाडीने निलेश लंके यांच्या रूपात एक तगडा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक राज्यात चर्चिली जात आहे. निलेश लंके यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदारसंघात विखे विरुद्ध पवार अशीच लढत आता होईल असे सांगितले जात आहे.