Soil Test : राष्ट्रीय कृषी विकास योजनेत मृद आरोग्य पत्रिका अभियान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यात शेत जमिनीतील मातीची तपासणी (Soil Test) करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या मृदा विभागाने कार्यवाही सुरू केली असून नगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) 6 हजार 696 माती नमुने गोळा केले आहेत. या माती नमुन्यांतील विविध घटकांची तपासणी करून त्यानुसार शेतकर्यांना (Farmer) डिजीटल स्वरुपात आरोग्य पत्रिका (Soil Health Card) देण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सहा याप्रमाणे 84 गावे निवडली आहेत. या गावांतून माती नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या माती नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर संबंधित शेतकर्यांना डिजीटल (Digital) स्वरुपात आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. या आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकर्यांना शेत जमिनीची काय परिस्थिती आहे. पिकांसाठी कोणती खते किती प्रमाणात वापरायला हवीत याची माहिती मिळणार आहे. याबाबत ‘कृषिक’ या मोबाइल अॅपवरही माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना स्मार्टफोनवरही (Smartphone) जमिनीच्या आरोग्याची (Health) माहिती कळणार आहे. सेंद्रीय कर्ब, सामू, क्षारता, नत्र, स्फूरद, पालाश, मँगनीज, गंधक, बोरॉन, लोह, तांबे असे विविध 12 घटक तपासण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या (Central Government) मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत शेत जमिनीतील माती तपासणी करण्यात आली. त्यानुसार आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या. नगर जिल्ह्यात 2015-16 व 2016-17 या वर्षातील पहिल्या टप्प्यात 7 लाख 79 हजार 692, 2017-18 व 2018-19 या वर्षात 10 लाख 30 हजार 668 तर 201-20 या वर्षातील पथदर्शी प्रकल्पात 12 हजार 295 अशा एकूण 18 लाख 22 हजार 665 आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या. मागील दोन वर्षात मात्र करोनाचे (Corona) संकट व निधी टंचाई यामुळे या काळात कामकाज बंद होते.