Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BLOG : झोपाळू शेती म्हणजे काय? सोप्पंय की.. फक्त ‘ते पदार्थ टाकून नफाच नफा उपसायचा..!

अरे.. शेती हा धंदा कधीच तोट्यात येऊ शकत नाही. कारण हा व्यवसाय करण्यासाठी कष्ट करणारे जिगरबाज लागतचं नाहीत. कष्टाळुंना कधी यश मिळतेय व्हयं? म्हणूनच शेती हा फक्त बोलघेवड्यांचाच उद्योग झाला आहे. त्यामुळेच कष्ट करणार्यांसाठी झोपाळू शेतीचा हा नवा पर्याय आम्ही आणलाय… त्याचे पॉइंट असे – (Zopalu sheti and Salt Farming / ZBNF (Zero Budget Natural Farming) difference)

Advertisement
  • शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी खतं गरजेची नसतात. फक्त गोमुत्र अन मीठ वापरलं तरी चालतं. गोमुत्र अन मीठ म्हणजेच सर्वोत्तम खत आणि कीटकनाशकही. म्हणजेच कमी खर्चात भरघोस उत्पादनवाढ…
  • गोधन आणि मीठ म्हणजे सगळेच काही. इतकचं काय ज्या शेतात मीठाचा वापर केलाय तिथे वरूणराजाही जादा मेहरबान असतो. तिथं जादा पाऊस पडतो म्हणजेच शेतकर्यांची चंगळचं चंगळं.
  • झिरो बजेटशेती म्हणजेही १ रुपड़्याचा खर्च न करता भरघोस उत्पन्न. भले आता त्याला नैसर्गिक शेती म्हणत असतील तुमच्या भाषेत. पण निसर्ग मेहरबान तर गधा पैलवान आहेच की.
  • मित्रांनो, बिनपाण्यानं केलेली चंपी भलेही त्रासदायक असो. पण बिनपाण्याची लिंबाची बाग म्हणजे एकाच एकरात लाखोंचा नफा. आहे की नाही दणक्यात मज्जा..!
  • बिनपाण्याची शेती म्हटल्यावर पाण्यासाठी विहिर-बोअरवेल घ्यायला नकोच की. जलसंधारण कामांची झंझट नको.. की पाईललाईन न् टँकरनं पिकांना पाणी टाकायला नको. म्हणजेच खर्च शुन्य आणि फक्त दमदार नफा..
  • नैसर्गिक पद्धत म्हणजेच नांगरणी, कोळपणी, खुरपणी आदींसाठी दमडी खर्चच करायला नको.
  • पिकांना फक्त गोमुत्राचा डोस दिला की काम फत्ते. त्यासाठीही कष्ट नाही लागत. गायाचशेतात चरायला सोडल्या की कामच फत्ते ! पीकही नको आणि मग कष्टही कशाचे?
  • किटकनाशकांसाठीही झाडपाल्यांचं औषध वापरावं. तसचं तो खर्च नसल्यानं फुकटातच मिळणार की हो एकरी लाखोंचं उत्पन्न. न् आजारांवरचा खर्चही मासिक यादीतून एकाच झटक्यात हद्दपार !
  • पिकांसाठी फक्त गोमूत्र न् मीठ वापरलं की भरघोस उत्पन्न मिळणार म्हटल्यावर उरतो फक्त पिक काढणी न् विक्रीता खर्च. मग उरतो सगळा फक्त नफा !
  • पिकाची पेरणी करायला नको की पूर्व न् आंतरमशागत नको. अशा पद्धतीनं फक्त जमिनीवर बिया फेकून दिल्या, मीठ न् गोमुत्राच्या खताचा डोस दिला, किड आल्यावर हेच दोन घटक फवारले की मिळणार ना भरघोस पैसा. हा यातही झाडपाला कुटण्याचं कष्ट आहेच. मात्र, त्यालाही काय किंमत म्हणा. कारण शेतकर्यांनाच किंमत नाही, तिथं त्यांच्या कष्टाचं काय म्हणा..!

…अशा पद्धतीने फक्त घरात झोपा काढून, गावभर सैराटपणे उनाडक्या करून, पत्ते कुटत बसून, प्रेमप्रकरणं करून, दारूत झिंग-झिंगाटूनही शेती लाखोंचा नफा देणारचं की? झिरो बजेटमंधी इतका पैसा म्हणजेच ‘झोपाळू शेती’…!

Advertisement

शेतकरी मित्रांन्नो, याचा जाम प्रचार करा. मला लेक्चरला बोलवा. मानधनही द्या… मग मी तुम्हाला याच्या ट्रीक्स सांगेल. नाममात्र शुल्कात प्रशिक्षण देईल. पुस्तक, सीड्या-डीव्हीड्याही विकेल. टीव्हीवर झळकेल. टीव्हीवाल्यांसह बांधावरून शेती करणारे ‘झोपाळू शेती’वाले माझे प्रचारक बनतील. काही भाट विरोधक करणार्यांवर केस करीत फिरतील. अशा पद्धतीनं मलाही कदाचित महाराष्ट्र किंवा भारताचा (अख्ख्या होल इंडियाचा) रत्न म्हणुन पुरस्कारही मिळेल. मग हीच विकासाची किमया यशकथांच्या माध्यमातून जागतिक वृत्तसंस्था जगापुढे मांडतील. त्यास कोणीही विरोध केला की, तो नक्कीच रासायनिक कंपन्यांचा भाट असेल. प्रश्न विचारल्यासही त्यांच्या तोंडावर आम्ही फोटो मारून त्याची ‘बिनपाण्यानं’ करू. मंग जागतिक स्तरावरचा नोबेल पुरस्कार आमच्या खिशात आल्यास नवल ते काय???

Loading...
Advertisement

असा आहे माझा शेतकर्यांच्या सर्वांगिण विकासीचा मूलमंत्र. अर्थात… “$झोपाळू शेती$” (Zopalu Sheti) (“हे सगळं मी झोपेतचं लिहिलयं. त्यातनं कोणाच्याही भावना दुखावल्यास माझी गाढ झोपच जबाबदार असेल. कृपया, याबद्दल केस करून किंवा विरोधाचे प्रश्न विचारून कोणीही झोपमोड करू नये, ही विनंती”)

Advertisement

लेखक : सचिन मोहन चोभे *(हा लेख २०१७ मधील असून सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे काही वाचकांच्या मागणीनुसार आम्ही यास प्रसिद्धी देत आहोत. कोणावरही टीका किंवा भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही. यामध्ये व्यक्त केलेल्या मुद्द्याशी कोणत्याही व्यक्तीचा थेट किंवा कसाही संबंध आढळला तर तो केवळ योगायोग समजावा. कारण असे योगायोग या जगात अनेकदा घडत असतात. त्यातलाच हा प्रकार आहे.)

Advertisement
Advertisement

Leave a Reply