Take a fresh look at your lifestyle.

MPKV च्या शेतकरी प्रथम सहलीमध्ये राहुल रसाळ यांनी केले मार्गदर्शन

अहमदनगर : महात्मा फुले कृषि विद्यापीठातंर्गत नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पातील चिंचविहीरे, कणगर, तांभेरे व कानडगाव गावातील शेतकर्‍यांचा अभ्यास दौरा हिवरेबाजार, राळेगणसिध्दी व निघोज ता. पारनेर येथील प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेतावर आयोजीत केला होता. या अभ्यास दौर्‍याच्या सुरुवातीला महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते दौर्‍याला प्रारंभ झाला.

Advertisement

यावेळी कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले की शेतकर्‍यांनी नवनविन प्रयोग तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करावा तसेच यशस्वी शेतकर्‍यांच्या अनुभवाचा उपयोग करुन आपली प्रगती साधावी. सदर अभ्यास दौर्‍याचे आयोजन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या अभ्यास दौर्‍यात प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख व डॉ. सचिन सदाफळ हे सहभागी झाले होते. शेतकरी प्रथम प्रकल्पातील चिंचविहीरे, कणगर, तांभेरे व कानडगाव गावातील 35 शेतकरी व महिला या अभ्यास दौर्‍यांमध्ये सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

हिवरेबाजार येथे हबीब सय्यद यांचेकडून गावात झालेल्या पाणलोट क्षेत्र विकासाची माहिती घेतली. राळेगणसिध्दी येथे मिडीया सेंटरला शेतकर्‍यांनी भेट दिली. यानंतर निघोज येथील हवामान अद्ययावत शेती करणारे प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेतास भेट दिली. यावेळी राहुल रसाळ यांनी आपल्या शेतात द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला यांचे उत्पादन घेतांना काटेकोर पाणी व्यवस्थापन, तंत्रज्ञान याबद्दल शेतकर्‍यांना माहिती दिली. तसेच त्यांनी बायोगॅस प्लँट व स्लरी प्लँट याबद्दल शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या शेतात लावलेले हवामान केंद्र, बाष्पीभवन यंत्र आणि विविध सेंसरद्वारे केलेले शेतीचे काटेकोर नियोजन याबद्दल प्रात्यक्षिक दाखविले. या दौर्‍यासाठी प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे आणि सहाय्यक किरण मगर व राहुल कोर्‍हाळे यांनी दौरा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply