Agriculture News: परभणी (आनंद ढोणे पाटील) : पूर्णा येथील तहसील कचेरीवर तारीख दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी असंख्य शेतक-यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरड्या दुष्काळाने वाळलेले सोयाबीन आणून टाकले. तहसीलदार पल्लवी टेमकर यांना हे सोयाबीन देऊन कोरडा दुष्काळ जाहीर करुन सरसकट आनूदान व पिक विमा भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
प्रहारचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, तालूका प्रमुख शिवहार सोनटक्के, भाटेगावचे माजी सरपंच चंद्रकांत क-हाळे पाटील व अन्य प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-याच्या वतीने शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्णा तालूक्यातील सर्व मंडळात मागील २८ दिवसापासून पाऊसाने मोठी दडी मारली आहे. त्यामुळे तालूक्यातील शेतक-यांचे सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद ही पीक अक्षरश वाळून गेली आहेत. पावसाने प्रदिर्घ विश्रांती घेतल्यामुळे सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन हे पीक कडक उन्हाने होरपळून गेले आहे. काही प्रमाणात पडलेल्या पाऊसाने सोयाबीन पिकाला काहीही फरक पडला नसून उलट पिकाला फोडणी बसल्यासारखे झाले आहे. आधी ओला आणि कोरडा दुष्काळ यामुळे दुहेरी संकटाने शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. शेतक-याकडे जगण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे शेती हेच जगण्याचे एकमेव साधन आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यावर आत्महत्येची वेळ आली आहे. प्रशानाने गांभीर्याने शेतक-याची बाजू लावून धरीत न्याय मिळवून द्यावा. पूर्णा तालूक्यात “कोरडा दुष्काळ जाहीर करुन आनूदान व पिक विमा भरपाई” देवून आधार देणे आवश्यक आहे.
शेतक-यांना सरसकट आनूदान व पिक विमा भरपाई नाही दिली तर प्रहार संघटना येणाऱ्या काळात तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावरुन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी सदरील मागणी व कोरड्या दुष्काळाची परिस्थिती जिल्हाधिकारी स्तरावर कळवू असे सांगितले. यावेळी तालूक्यातील अनेक गावातून असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.