Agriculture News: सोलापूर (Solapur News): पक्व खरीप मूग, उडीद, सोयाबिन, मका, बाजरी आणि सूर्यफूल पिकाची त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. असा सल्ला ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ , सोलापूर (AGROMET ADVISORY BULLETIN GRAMIN KRISHI MAUSAM SEWA, DISTRICT AGROMET UNIT, KRISHI VIGYAN KENDRA, MOHOL, SOLAPUR.) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच भाजीपाला आणि फळ पिकाबाबत सल्ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
सध्या आद्रतायुक्त हवामानामुळे या हंगामातील मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, कांदा, भोपळा, कारली या (Vegetable Crops Chilli, tomato, okra, brinjal onion, bottle gourd, bitter gourd) पिकांच्या पानांवरील करपा, फळकुज आणि फांद्या वळणे या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायफेनकोनॅझोल १० मिली किंवा अॅझोक्झीस्ट्रोबीन १० मिली किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या आलटून पालटून कराव्यात. तसेच या पिकांवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने स्वच्छ व निरभ्र वातावरणात कराव्यात. केळी (Banana) सध्याच्या ढगाळ, उष्ण व दमट हवामानामुळे केळीवरील करपा (सिगाटोका) रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पानाचा भाग/ पाने काढून जाळावीत. रोगाची लक्षणे दिसताच प्रोपीकोन्याझोल ५ मिली. व मिनरल ओईल १०० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. त्यानंतर २० दिवसाच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी : लम्पी त्वचा रोग (Lumpy skin disease) या रोगाचा संसर्ग “कॅप्रीपॉक्स” (Capri pox) विषाणू मुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, गोचिड व तत्सम किड्यांच्या बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंधक करणे. प्रतिबंधात्मक उपाय योजना : तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार औषध मलम लावावे. लम्पी या त्वचा रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोट पॉक्स या लसीचे लसीकरण करून घ्यावे. (Goat pox vaccine should be administered on the advice of a veterinarian to control lumpy skin disease.)