मुंबई- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेनंतर टीम इंडियाला (Team India) दुहेरी धक्का बसला आहे. एकदिवसीय मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) देखील टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. ICC ने स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावला आहे.
आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना आढळले की टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली. याच कारणामुळे टीम इंडियाला शिक्षा झाली आहे. ICC ने सांगितले की आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार, खेळाडूंना त्यांच्या संघाच्या निर्धारित वेळेत प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.
आयसीसीने सांगितले की कर्णधार केएल राहुलने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि प्रस्तावित शिक्षाही मान्य केली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नाही. मैदानावरील पंच मारायस इरास्मस आणि बोंगानी झेले, तिसरे पंच अलाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच एड्रियन होल्डस्टेंक यांनी हे आरोप केले आहेत.
केपटाऊनमध्ये झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा चार धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 49.5 षटकांत 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया 49.2 षटकांत 283 धावा करून सर्वबाद झाली. यासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. दक्षिण आफ्रिकेने पहिला एकदिवसीय सामना 31 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना सात विकेटने जिंकला होता.