नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस या धक्क्यातून सावरत असतानाच आणखी एक धक्का पक्षाला बसला आहे. कुशीनगरच्या पडरौना मतदारसंघातून काँग्रेसचे घोषित उमेदवार मनीष जैसवाल यांनीही राजीनामा दिला आहे. मनीष जयस्वाल यांनी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याकडे पाठवला आहे. यापूर्वी जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. वास्तविक, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी नेत्यांच्या पक्षांतराची प्रक्रियाही सातत्याने सुरू आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते एक एक करून पक्ष सोडत आहेत. यावेळी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांपैकी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनीष जैस्वाल यांच्याशिवाय जिल्हाध्यक्ष राजकुमार सिंग, जिल्हा सरचिटणीस टीएन सिंग, किसान संघटनेचे अवधेश सिंग यांच्यासह बहुतांश पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पडरौना विधानसभेचे घोषित उमेदवार मनीष जैस्वाल आणि जिल्हाध्यक्ष राजकुमार सिंह यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, आरपीएन सिंह हे काँग्रेसच्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक आहेत. ते काँग्रेसच्या राष्ट्रीय संघाचाही एक भाग राहिले आहेत. पक्षाने त्यांना झारखंडचे राज्य प्रभारीही केले. त्यानंतर मात्र आरपीएनचा काँग्रेसबद्दलचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता काँग्रेसच्या अडचणी आधिकच वाढणार आहेत. आधीच या राज्यात काँग्रेस अडचणीत आहे. त्यानंतर या धक्क्याने पक्षाच्या अडचणी मात्र वाढणार आहेत. कारण, आरपीएन सिंह यांच्यानंतर काँग्रेसमधील अनेक जणांनी राजीनामा दिला आहे.