Haryana : बिहारमधील (Bihar) सत्ताबदलानंतर सहकारी पक्ष भारतीय जनता पक्षावर दबाव आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याचा परिणाम हरियाणामध्येही (Haryana) दिसून येत आहे, जिथे भाजप जननायक जनता पक्षाच्या सहकार्याने सरकार चालवत आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) 2024 मध्ये हरियाणाचे पुढील मुख्यमंत्री होतील, असे जेजेपी (JJP) प्रदेशाध्यक्ष निशान सिंह यांनी म्हटले आहे.
कर्नालमध्ये मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की “प्रत्येकाला पुढे जायचे आहे आणि मला त्यात काहीही गैर दिसत नाही. आणि दुष्यंत चौटाला हे पुढील मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची आणि तरुणांची इच्छा आहे. त्याआधी, निशान सिंह यांनी राज्यमंत्री अनूप धनक यांच्यासह कर्नालमध्ये पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना पंचायत निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले. मात्र, त्यांनी भाजप-जेजेपी युतीमध्ये पंचायत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मात्र पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे धनक म्हणाले.
आदमपूर पोटनिवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तारीख जाहीर झाल्यानंतर निर्णय घेऊ. ते म्हणाले की, काँग्रेसने (Congress) राज्यात जागा गमावली आहे आणि केडर तयार करण्यात अपयशी ठरले आहेत.
दरम्यान, बिहारमधील सत्ताबदलानंतर भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तर भारतातील एक मोठे राज्य हातातून गेले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला एक प्रकारे धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यात आता या वर्षाच्या शेवटी गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या घडामोडींचा परिणाम या राज्यातील निवडणुकांवर होणार हे निश्चित. विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपसाठी अडचणीचे ठरते. हे याआधी अनेकदा दिसून आले आहे. बिहारमध्येही असेच काहीसे घडले आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी जेडीयूसह राजद आणि अन्य सहकारी पक्ष एकत्र आले.