मुंबई- केपटाऊनमधील (Cape Town) न्यूलँड्स येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया चार बदलांसह मैदानात उतरली आहे. कर्णधार केएल राहुलने आज स्पिन अष्टपैलू जयंत यादवला (Jayant Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. यासह जयंत तब्बल सहा वर्षांनी टीम इंडियात परतला आहे.
जयंत यादवने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला या फॉरमॅटमध्ये एकदाही संघात स्थान मिळालेले नाही. या मालिकेत वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीनंतर त्याला संधी मिळाली. पहिल्या दोन वनडेत भारताच्या पराभवानंतर रविचंद्रन अश्विनच्या जागी जयंत यादवला (Jayant Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
जयंत यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ एक धाव केले होते. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याला एक विकेट मिळाली होती. याशिवाय त्याने भारतासाठी आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 16 विकेट आणि 246 धावा आहेत. याच बरोबर त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
तिसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादव, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. तर भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, व्यंकटेश अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांना आराम देण्यात आला आहे.