मुंबई : देशातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या Adani Wilmar च्या IPO बाबत महत्वाची बातमी आहे. हा आयपीओ 27 जानेवारी रोजी उघडेल आणि 31 जानेवारी 2022 रोजी बंद होईल. अदानी विल्मर ही FMCG क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. खाद्यतेलाच्या प्रमुख कंपनीने IPO साठी प्रति शेअर 218-230 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3,600 कोटी रुपयांच्या IPO मध्ये फक्त ताज्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 87.95 टक्क्यांवर येईल. प्रारंभिक शेअर विक्रीसाठी अँकर गुंतवणूकदारांची बोली आजपासून सुरू होईल. अदानी विल्मरचा स्टॉक 8 फेब्रुवारी रोजी BSE आणि NSE वर लिस्ट होईल. फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत स्वयंपाकाचे तेल आणि इतर काही खाद्यपदार्थांची विक्री करणार्या अदानी विल्मरने त्यांच्या आयपीओचा आकार 4,500 कोटी रुपयांवरून कमी करून 3,600 कोटी रुपये केला आहे. ही कंपनी अदानी एंटरप्रायझेस आणि सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलचा संयुक्त उपक्रम आहे.
IPO ची किंमत 218-230 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे आणि 65 शेअर्सचा एक लॉट साइज आहे. गुंतवणूकदार किमान एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतात. शेअर्सचे वाटप 3 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. डिमॅट खात्यातील शेअर्सचे वाटप 7 फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात IPO लाँच होण्याआधी, अदानी विल्मरचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होते. शुक्रवारी ग्रे मार्केट प्रीमियम 100 रुपयांवरून निम्म्यावर आला आहे.
दरम्यान, देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता पुढच्या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
‘या’ कंपनीचा तब्बल 1000 कोटींचा आयपीओ येतोय; पहा, कंपनीचे काय आहे नियोजन..