Abu Azmi News : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचाराची सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे. यातच राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आज मी लवकरच समाजवादी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सपा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश करू शकतात. रविवारी रात्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि अबू आझमी यांच्यात मुंबईत बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीत आझमी यांनी अजित दादांच्या पक्षात प्रवेश करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भाजपचे एक मोठे नेते अबू आझमी यांना महायुतीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपमध्ये प्रवेश न झाल्याने अबू आझमी राष्ट्रवादीत जाणार आहेत. महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे.
कोण आहे अबू आझमी?
अबू आझमी हे सपाचे मोठे नेते असून महाराष्ट्रातील सपाचे प्रमुख आहेत. मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून ते तीनदा आमदार झाले आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदारही राहिले आहेत. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिमांमध्ये आझमी यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास ईशान्य मुंबई लोकसभा जागेवर महायुतीला अधिक फायदा होईल.
या आठवड्यात सपा आमदार अबू आझमी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अबू आझमी यांना विशेषतः मुंबईतील मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. त्यांनी सपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास अजित पवारांची ताकद वाढेल आणि विरोधी गटातील विशेषत: अखिलेश यादव यांना मोठा फटका बसेल.
अबू आझमी का नाराज आहेत?
गेल्या काही दिवसांपासून अबू आझमी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच भिवंडीतील सपाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. अबू आझमींवर निशाणा साधत शेख यांनी समाजवादी पक्षावर दलालांचे वर्चस्व असल्याचा आरोप केला होता. मात्र, अवघ्या 24 तासांत शेख यांनी राजीनामा मागे घेतला.
रईस शेख यांनी शनिवारी जाहीर केले की सपाचे राज्य नेतृत्व त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र विधानसभेचा राजीनामा देत आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या विनंतीवरून आपण राजीनामा मागे घेतल्याचे शेख यांनी रविवारी सांगितले.