AAP Politics : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय (AAP Politics) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीतील बदली आणि पोस्टिंगच्या केंद्राच्या अध्यादेशासंदर्भात केजरीवाल देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. यासाठीच त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, लोकनियुक्त सरकारांना अध्यादेशांचा वापर करून काम करण्याची परवानगी दिली जात नाही. हा प्रकार देशासाठी चांगला नाही. जर देशातील सगळेच गैर भाजप पक्ष एकत्र आले तर दिल्लीतील सेवांवर नियंत्रणाशी संबंधित केंद्र सरकारच्या अध्यादेशावर आणले जाणारे विधेयक राज्यसभेत रोखता येईल.
दिल्लीतील नागरिकांच्या विरोधात मोदी सरकारकडून आणला गेलेला काळा अध्यादेस आपल्या सगळ्यांना मिळून संसदेत रोखायचा आहे. या मुद्द्यावर आज शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेब राज्यसभेत दिल्लीच्या नागरिकांना सहकार्य करतील. दिल्लीतील नागरिकांच्यावतीने मी पवार साहेबांचे आभार मानतो. लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई आपण सगळे एकत्र येऊन लढू या.
यानंतर पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करण्यासाठी आम्ही अन्य नेत्यांशीही चर्चा करू. देशातील सर्व गैर भाजप पक्षांना एकत्र आणण्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. देशात सध्या संकट आहे आणि हे संकट फक्त दिल्लीपुरतेच मर्यादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि या राज्यातील नागरिक केजरीवाल यांचे समर्थन करतील.
अध्यादेश संसदीय लोकशाहीसाठी धोका आहे. आपल्याला आता हे निश्चित करावे लागेल की सर्व गैर भाजप राजकीय पक्ष केजरीवाल यांना समर्थन देतील. आता संसदीय लोकतंत्राचे अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.