दिल्ली – देशातील दूरसंचार क्षेत्र (Telecom Industry) वेगाने वाढत आहे. यामध्ये 5G सर्वात वेगाने वाढणारे तंत्रज्ञान (5G Technology) असेल. 2027 च्या अखेरीस देशातील 5G ​​ग्राहकांची संख्या तब्बल 50 कोटींपर्यंत असेल. हा आकडा एकूण मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या 39 टक्के असेल. स्वीडिश टेलिकम्युनिकेशन उपकरणे बनवणारी कंपनी एरिक्सनने (Ericson) एका अहवालात ही शक्यता व्यक्त केली आहे. एरिक्सन मोबिलिटी अहवालात असे नमूद केले आहे, की 2022 च्या उत्तरार्धात भारतात 5G नेटवर्कचे व्यावसायिक लाँच करण्याचे नियोजित आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, यामुळे मोबाइल ब्रॉडबँडची (Mobile Broadband) क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

अहवालात असे भाकीत केले आहे, की 2027 च्या अखेरीस 5G नेटवर्क वापरणाऱ्या लोकांची संख्या एकूण स्मार्टफोन युजर्सच्या 40 टक्क्यांहून अधिक होईल. एरिक्सनचे नेटवर्क डेव्हलपमेंटचे प्रमुख थिव्ह सेउंग एनजी म्हणाले, की “2021 ते 2027 दरम्यान भारतातील एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिक चार पटीने वाढण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली मोठी वाढ आणि प्रति स्मार्टफोन सरासरी वापरामध्ये झालेली वाढ यामुळे हे घडते. देशातील प्रति स्मार्टफोन सरासरी डेटा ट्रॅफिक सध्या जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, 2021 मधील 20 GB प्रति महिना वरून 2027 मध्ये सुमारे 50 GB प्रति महिना वाढण्याचा अंदाज आहे जो 16 टक्के वार्षिक वाढ दर्शवितो.

भारतात 5G तंत्रज्ञानाचा वापर सुरूही झालेला नाही पण पुढील पाच वर्षात जवळपास 40 टक्के स्मार्टफोन वापरकर्ते 5G तंत्रज्ञान वापरणार आहेत. जागतिक पातळीवर हे प्रमाण 2027 मध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. 5G तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल घडून येतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. देशातील खासगी टेलिकॉम कंपन्या तसेच केंद्र सरकारही 5G तंत्रज्ञान लवकरात लवकर सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

5G बाबत मोठी बातमी..! केंद्र सरकारने ‘त्यासाठी’ केलीय जोरदार तयारी; पहा, कधी मिळेल नवे तंत्रज्ञान

Share.

Leave A Reply

Exit mobile version