5G Network : देशभरातील काही शहरात आजपासून (1 ऑक्टोबर) 5G नेटवर्क (5G Network) सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 मध्ये 5G दूरसंचार सेवा अधिकृतपणे भारतात सुरू होणार आहे. देशातील तीन आघाडीच्या दूरसंचार सेवा प्रदाते – रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन आयडिया (Vodafone idea), आणि एअरटेल (Airtel). देशातील 5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडीया आणि अदानी समूह हे चार प्रमुख सहभागी होते. या लिलावादरम्यान दूरसंचार विभागाला (DoT) 1.50 लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या.
देशातील 5G रोलआउटचा पहिला टप्पा अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे (Pune) या 13 प्रमुख शहरांमध्ये होईल. दुसरीकडे, Telecom Talk ने आपल्या अहवालात दावा केला आहे की 5G गेम चेंजर असणार आहे. परंतु, देशातील सर्व वापरकर्त्यांसाठी ते हळूहळू येईल. जिओ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार ठिकाणांहून सुरू होईल. लाँच केल्यानंतर दिल्लीच्या काही भागात वापरकर्ते 5G वापरण्यास सक्षम असतील. दिल्ली आणि त्यावरील शहरांमधील प्रत्येक वापरकर्त्याला पूर्णपणे 5G गती मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. यामुळे जरी कंपनीने 5G टॅरिफ लाँच केले तरी ते 4G टॅरिफपेक्षा फारसे वेगळे नसतील. किंवा 4G प्लानसह 5G ऑफर केले जाण्याची शक्यता असू शकते. हे फक्त सबस्क्राइबर कुठे आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचे नेटवर्क कव्हरेज मिळत आहे यावर अवलंबून असू शकते.
रिलायन्स जिओचे जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीने उघड केले आहे की 2023 च्या अखेरीस देशभर 5G कव्हरेज ऑफर करण्याची त्यांची योजना आहे. त्याचप्रमाणे 2024 पर्यंत संपूर्ण देशात कव्हरेज प्रदान करण्याचे एअरटेलचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडीया 5G रोलआउट ग्राहकांच्या मागणीवर आधारित, इतर घटकांमधील स्पर्धा यावर आधारित असेल. कंपनीने नजीकच्या भविष्यात आपल्या नेटवर्क प्लानचे दर वाढ करण्याची योजना आखली आहे.
अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय ग्राहक 5G अपग्रेडसाठी 45 टक्के प्रीमियम भरण्यास तयार आहेत. देशात 5G तयार स्मार्टफोन असलेले 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत. 5G तंत्रज्ञान सध्याच्या 4G कनेक्टिव्हिटीपेक्षा सुमारे 10 पट वेगवान असण्याची अपेक्षा आहे.