नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात कडाक्याचा हिवाळा जाणवत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात तर थंडीची लाट दिसून येत आहे. त्यामुळे दाट धुके दिसत आहे. या धुक्यामुळेच रेल्वेला फक्त दोनच दिवसात कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. धुक्यामुळे भारतीय रेल्वेने आजही शेकडो गाड्या रद्द केल्या आहेत. बहुतेक रेल्वे फेऱ्या रद्द होण्याचे कारण धुके बनले आहे. उत्तर भारतातील पावसामुळे आता धुके दाट होत आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीत अडचणी येत आहेत. खराब हवामान आणि धुक्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. रविवारीही एक हजारहून अधिक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या.
भारतीय रेल्वेने आज 494 रेल्वे रद्द केल्या आहेत. याशिवाय 7 रेल्वे फेऱ्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून अनेक 24 रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ या रेल्वेचे सुरुवातीचे किंवा शेवटचे स्टेशन बदलण्यात आले आहे. आज रद्द करण्यात आलेल्या बहुतांश रेल्वे बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जाणार आहेत.
भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या ट्रेनची स्थिती जाणून घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये. धुक्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ट्रेन रद्द झाली किंवा उशीर झाला तर या काळात रेल्वे स्टेशनवर थांबण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो.
रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे रद्द झालेल्या फेऱ्यांची यादी रेल्वेच्या वेबसाइटवर टाकली जाते. याशिवाय त्याची माहिती NTES अॅपवरही उपलब्ध आहे. कोणत्याही ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे ट्रेनचा नंबर टाकून तुम्ही अपडेट जाणून घेऊ शकता. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीला रद्द झालेल्या फेऱ्यांची संपूर्ण यादी हवी असेल, तर त्यासाठी त्याला रेल्वेच्या वेबसाइटवरही ही यादी मिळू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.